मुंबई : राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर कुणीही त्यांचा वाढदिवस साजरा करु नये, तसंच हितचिंतकांनीही कोणतेही कार्यक्रम आयोजित करु नयेत, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचं काटेकोर पालन करुन, राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र कोरोना संकटामुळे वाढदिवस कोणत्याही स्वरुपात साजरा न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. कार्यकर्त्यांनी कोणतेही कार्यक्रम, भेटीगाठी न करता, त्याऐवजी कोरोनामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांची मदत करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
'राज्यातील समस्त हितचिंतकाच्या शुभेच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत. या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. परंतु प्रत्यक्ष भेटीसाठी न येता डिजिटल माध्यमातून शुभेच्छा पाठवाव्यात,' असं अजित पवारांनी सांगितलं आहे. तसंच, कोरोनाच्या पार्श्भूमीवर सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.