'तू माझ्याशी लग्न कर, 6 महिन्यात घटस्फोट घे आणि 25 लाख रुपये देच नाहीतर...'

धक्कादायक! तू माझ्याशी लग्न कर हवं तर घटस्फोटही घे पण.... तरुणीनं लग्नाचाच मांडला बाजार? होणाऱ्या नवऱ्यासमोर ठेवली अट

Updated: Jan 5, 2022, 08:46 PM IST
'तू माझ्याशी लग्न कर, 6 महिन्यात घटस्फोट घे आणि 25 लाख रुपये देच नाहीतर...' title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : तुम्ही जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला लग्नासाठी तरुण किंवा तरुणी पाहात असाल तर थांबा. ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आज लग्न म्हणजे एक पवित्र बंधन आणि नातं बाजूला राहुन धंदा झाला आहे. तुम्ही जर ऑनलाइन मेट्रोमोनी साईटवर तुमचं किंवा तुमच्या ओळखीत कोणाचं नाव असेल तर सगळी माहिती काढणं आवश्यक आहे. 

तू माझ्याशी लग्न करं हवं तर घटस्फोटीही घे पण मला 25 लाख रुपये देच असा तगादा तरुणीनं लावला. जर 25 लाख रुपये दिले नाहीत तर तुला खोट्या केसमध्ये अडकवेन अशी थेट धमकीही दिली. 

नेमकं काय प्रकरण? 
मिलिंद बोरकर हे 2007 पासून अमेरिकेतील एक प्रसिद्ध कंपनीमध्ये काम करतात. भारतातील मुलीशी लग्न करण्याचा त्यांचा मानस होता. अखेर तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. 2019 मध्ये हा शोध थांबला आणि त्यांना एक तरुणी भेटली. 

मेट्रोमोनियल साईटवरून दोघांची ओळख झाली. संभाषण सुरू झालं आणि एका कार्यक्रमादरम्यान दोघांनी साखरपुडाही उरकला.  21 जुलै 2019 रोजी साखरपुड्यावेळीच मिलिंद यांना संशयाची पाल चुकचुकली. 

मिलिंद यांनी आपल्या होणाऱ्या पत्नीचा फोन चेक केला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकरली. ही संशयाची पाल दुसरं तिसरं काही नसून त्या मुलीचे एका तरुणासोबतचे खासगी फोटो होते. शिवाय  तिचे दुसऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.

या सगळ्या प्रकारानंतर मिलिंद यांना खूप मनस्ताप झाला. त्यांनी लग्नाची तयारीही थांबवली आणि लग्न मोडलं. लग्न मोडल्याचं सांगताच तरुणी आणि तिच्या कुटुंबाने मिलिंद यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. 

लग्न कर आणि 6 महिन्यात घटस्फोट घेऊन मला 25 लाख देच असा तगादा सुरू केला. 25 लाख रुपयांची मागणी केली आणि असे केले नाही तर मिलिंदला खोट्या खटल्यात अडकवण्याची आणि तसे न केल्यास त्याचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली.

वर्सोवा पोलिसांनी ती मुलगी , चंद्रकांत गायकवाड, संजीव सोनवणे आणि प्रतीक गायकवाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३८९, ३८५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या बाबत आम्ही सविस्तर चौकशी करत आहोत खरेच पैसे मागितले आहे का ? किंवा आरोप केले त्याबद्धल ची सत्यता पडताळणी होईल.

या प्रकरणाचा  संपुर्ण तपास करत आहोत या बाबत फिर्यादी आणि आरोपी या दोघांकडून माहिती घेत आहोत कायदेशीर तपास पूर्ण केला जाईल, शी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि या गुन्ह्याचे तपासी अधिकारी कांदळकर यांनी दिली आहे