मुंबई : मुंबईकरांना भूक लागली की, त्यांचा सर्वात आवडता वडापाव मदतीला धावून येतो. २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस, तेव्हा या वडापावची चर्चा तर झालीच पाहिजे, वडापावची सुरूवात पहिल्यांदा १९६६ मध्ये दादरमधून झाल्याचं सांगतात. मुंबई या शहराची लांबी तशी जास्त आहे, आणि एकदा कामानिमित्त बाहेर निघालेला माणूस सायंकाळीच घर गाठतो, तेव्हा कुठे भूक लागली, तर उभं राहून किंवा चालताना खाता येईल असा एकमेव पदार्थ म्हणजे वडापाव. लादीपावमध्ये, तळलेला बटाटा वडा ठेवला, तिखट, गोड चटणी टाकली, की वडापाव तय्यार.
हा चटपटीत वडापाव मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्यानंतर अधिक वाढला. वडापावामुळे अनेकांना रोजगार मिळाला, तर कमी पैशात भूकेलेल्याचं पोट भरू लागलं.या वडापावला त्या काळी शिवसेनेचा पाठिंबा होताच. या काळात शिवसेनेने दक्षिण भारतीयांच्या विरोधात 'बजाव पुंगी, हटाव लुंगी' सुरू केलं होतं. याच वेळी दाक्षिणात्य इडली सांबरला फाईट मराठी मुलांच्या वडापावने दिली. शिवसेनेने हा वडापाव प्रमोट केला.
मुंबईत अनेक वडापाव प्रसिद्धीला आले आहेत, यात कीर्ती कॉलेजवळचा अशोक वडापाव हा सर्वात लोकप्रिय आणि चवदार मानला जातो. येथे लांबून वडापाव खाण्यासाठी येतात, आणि ऑफिसात पार्टी असली तर वडापावचं पार्सल सुद्धा नेलं जातं. कीर्तीचा वडापाव हा चुरापाव म्हणूनही प्रसिद्ध आहे, यात भजीसारखा चुरा देखील असतो. अशोकचा वडापाव हा गोड चवदार चटणीमुळे अधिक चवदार लागतो, असं खवैय्याचं मत आहे.
सीएसटीजवळचा आरामचा वडापाव देखील लोकप्रिय आहे. १९३९ साली सुरू झालेल्या आराम हॉटेलच्या बाजूला त्यांनी वडापावचा स्टॉल सुरू केला हा वडापाव देखील खवय्यांना नेहमीच आकर्षित करतो. साधारण जेथे गोड आणि तिखट चटणी वडापाव सोबत मिळते, तेथील वडापाव जास्त प्रसिद्धीला आले आहेत. गोड चटणीत प्रामुख्याने चिंचा आणि खजूराचा वापर करण्यात येतो.