इथे ओशाळली माणूसकी! रक्तबंबाळ तरुण मदत मागत होता, लोकं मोबाईलमध्ये फोटो काढत होते

जखमी अवस्थेतच जवळपास 20 ते 25 मिनिटं तरुण ट्रकखाली पडून होता

Updated: Aug 12, 2021, 08:12 PM IST
इथे ओशाळली माणूसकी! रक्तबंबाळ तरुण मदत मागत होता, लोकं मोबाईलमध्ये फोटो काढत होते title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : अपघातात रक्तबंबाळ झालेला तरुण मदतीसाठी याचना करत होता. पण बघे मदत करण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो आणि शुटिंग करत होते. तो तरुण जीव वाचवण्यासाठी हात जोडत होता पण मदतीसाठी मात्र एकही हात पुढे आला नाही.

विरार पूर्व मधल्या नारिंगी इथली ही धक्कादायक घटना आहे. नारिंगी इथल्या फाटकाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला उडवलं. कुणाल तांडेल असं या जखमी तरुणाचं नाव आहे. सुदैवाने या अपघातात कुणालचा जीव वाचला. मात्र, त्याच्या पायावरुन ट्रकचा टायर गेल्याने कंबरेच्या खालच्या भागाला गंभीर दुखापत झाला. 

अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. पण एकही नागरिक तरुणाच्या मदतीला पुढे आला नाही. गंभीर जखमी झालेला हा तरुण मदतीसाठी याचना करत होता. जखमी अवस्थेतच जवळपास 20 ते 25 मिनिटं हा तरुण ट्रकखाली पडून होता. अनेक जण हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते. मात्र या जखमी तरुणाची मदत करण्यासाठी एकही नागरिक पुढे आला नाही. 

अखेर याच रस्त्यावरून जाणारे चिकन विक्रेते असलेल्या नावेद खान यांनी पुढाकार घेत आपल्या राहत्या परिसरातून रिक्षा बोलावून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. 

पण या घटनेनं माणुसकी संपली का असा प्रश्न उपस्थित होतोय.