मुंबई : आता पालकांची झोप उडवणारी बातमी. तुमची मुलं शाळा-कॉलेजात जात असतील तर ही बातमी नक्की पाहा. मुलांच्या शिक्षणावरच्या खर्चात (Education Expenses) गेल्या काही वर्षांत कशी वाढ झालीय? आणि पालकांना वाढीव भुर्दंड कसा सोसावा लागतोय, पाहूयात (Zee 24 Taas Special Report) हा रिपोर्ट. (zee 24 taas special report know how many money education expenses on your child)
महागाईचा फटका आता शाळा-कॉलेजात शिकणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही बसतोय. खासगी शाळा आणि कॉलेज शिक्षणाचा गेल्या आठ वर्षांत खर्च एवढा वाढलाय की, पालकांचे धाबे दणाणलेत. अलिकडेच एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. त्यात शिक्षणावरचा खर्च किती वाढलाय, याची आकडेवारी पाहिली तर तुमचे डोळे गरगरल्याशिवाय राहणार नाही.
गेल्या 10 वर्षांत ग्राहक मूल्य निर्देशांकात 4.5 टक्क्यानं वाढ झालीय. खासगी शिक्षणावरचा खर्च 2012 ते 2020 या काळात 10 ते 12 टक्क्यांनी वाढलाय. शाळांच्या प्रवेश शुल्कात 25 ते 75 हजार रुपये एवढी वाढ झालीय. मोठ्या शहरांमध्ये शिशूवर्गाची फी 60 हजार ते 1.5 लाख रुपये इतकी वाढलीय. पहिली ते दहावी शिक्षणासाठी सुमारे 20 लाख रुपये खर्च येतो.
तर दहावीनंतर कॉलेज शिक्षणासाठी 4 ते 20 लाख रुपये खर्च होतो. कामावर जाणारे पालक आपल्या मुलांना डे केअर सेंटरमध्ये ठेवतात. तिथंही दरमहा किमान 10 हजार रुपये शुल्क आकारलं जातं. त्याशिवाय शाळेची बस आणि परीक्षा शुल्कात देखील लक्षणीय वाढ झालीय.
धक्कादायक बाब म्हणजे हा केवळ शाळा आणि कॉलेजमधील शिक्षणाचा खर्च आहे. जर दहावी आणि बारावीला मुलांना तुम्ही खासगी कोचिंग क्लासेसला पाठवत असाल तर या खर्चात आणखी दुप्पट ते तिप्पट वाढ होते.
मेडिकल किंवा इंजिनिअरींग कोचिंग क्लासेसचा खर्च तर कोटींच्या घरात पोहोचतो. त्यामुळं मुलांना चांगलं आणि दर्जेदार शिक्षण द्यायचं झालं तर पालकांच्या तोंडाला मात्र फेस येतोय.