मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी, धारावीत कोरोना रुग्णांची शून्य संख्या

 राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, पहिल्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आता परिस्थिती नियंत्रणात दिसून येत आहे. 

Updated: Jun 14, 2021, 04:22 PM IST
मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी, धारावीत कोरोना रुग्णांची शून्य संख्या
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, पहिल्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आता परिस्थिती नियंत्रणात दिसून येत आहे. रुग्णसंख्येत आतापर्यंत सातव्यांदा धारावी शून्यावर आहे. ( zero corona patients) धारावी कोरोनामुक्त झाली आहे. (zero corona patients in Dharavi) मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. परिणामी मुंबईच्या विविध भागात रुग्णसंख्या झपाट्याने खाली येते आहे. यात धारावीचा समावेश असून येथे शून्य संख्या आहे.

गेल्या काही दिवसांपासून धारावीत केवळ एक-दोन रुग्ण आढळून येत होते. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ती खाली आली आहे. धारावीची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू होती. आज अखेर धारावी कोरोनामुक्त झाली आहे. कोरोना संकट सुरु झाल्यापासून पहिल्या लाटेत धारावीत 25 डिसेंबर रोजी शून्य रुग्ण होते. आता दुसऱ्या लाटेत आज 14 जून रोजी रुग्णसंख्या शून्यावर आहे.

पहिली लाटेत या तारखेंना शू्न्य रुग्ण

25 डिसेंबर
22 जानेवारी
26 जानेवारी
27जानेवारी
31 जानेवारी
02 फेब्रुवारी

दुसऱ्या लाटेत 14 जून 2021 रोजी शू्न्य रुग्ण आहेत. आतापर्यंत सातव्यांदा धारावी शून्यावर आली आहे. त्यामुळे ही बातमी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत दुसऱ्या लाटेतही कमाल करुन दाखवली आहे. गेल्यावर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत धारावीत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. दररोजची रुग्णसंख्या अंदाजे 400 हून अधिक नोंदवली जात होती. यावेळी पालिकेने 'मिशन झिरो', 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' यासह विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या. परिणामी यंदाच्या जानेवारीपर्यंत धारावी करोनामुक्त झाली. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला होता. मात्र, आधीच्या अनुभवावरून मुंबई महापालिकेने उपाययोजना आणखी चांगल्या पद्धतीने राबत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला आहे. त्यामुळे आज धारावीत शून्य रुग्णसंख्या आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून धारावीत दररोज एक ते 12पर्यंत नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मागील पंधरा दिवसांत काही दिवस एक ते दोन रुग्णांची नोंद झाली होती. धारावी विभागात आतापर्यंत कोरोनाबाधित 6859 रुग्णांची नोंद झाली आहे. आता सगळे रुग्ण बरे झाले आहेत. धारावीची शून्य संख्या आणण्यात मुंबई महापालिकेची आरोग्ययंत्रणा, खासगी डॉक्टर आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने महत्वाची भूमिका बजावली आहे.