२६/११ला ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाहणी करण्यासाठी राम गोपाल वर्मा यांनी उपस्थिती लावली होती मात्र यावर आपण सिनेमा करत नसल्याचं खुलासा त्यावेळी राम गोपाल वर्मा यांनी केला होता मात्र हेच राम गोपाल वर्मा आता तीन वर्षानंतर या घटनेवर सिनेमा करत आहेत.
२६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याने साऱ्या जगाला हादरवून सोडलं.३ वर्षानंतरही या हल्लाच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात आजही ताज्या आहेत. या भीषण हल्लात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्लाची पाहणी करण्यासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख ताजमध्ये गेले आणि त्यांची ही भेट वादळी ठरली, कारण ताजवर झालेला हल्ला पाहण्यासाठी विलासराव देशमुख यांच्यासह राम गोपाल वर्मादेखील उपस्थित होते. राम गोपाल वर्मा यांना तिथे पाहताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या संवेदनशील घटनेची पाहणी करताना राम गोपाल वर्मा यांच्यासारख्या फिल्ममेकरच तिथं काय काम? ते या हल्ल्यावर सिनेमा तर करू पाहत नाहीयेत ना, अशाही चर्चा तेव्हा रंगल्या. तेव्हा या घटनेवर आपण सिनेमा करत नसल्याचं राम गोपाल वर्मा यांनी स्पष्ट करत या प्रकरणातून आपले हात झटकले खरे, पण नंतर हे प्रकरण विलासराव देशमुख यांच्या चांगलंच अंगाशी आलं. कारण विलासराव देशमुख राम गोपाल वर्मा यांना ताजवर झालेल्या हल्याची पाहणी करण्यासाठी घेऊन गेल्याची बातमी दिल्लीपर्यंत जाऊन पोहचली आणि अखेर विलासरावांना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. रितेश देशमुखसह राम गोपाल वर्मा ताज हॉटेलची पाहणी करतानाचं दृष्य सगळ्यांनीच पाहिलं. तिथे एक फिल्ममेकर म्हणून गेलो नव्हतो असं जरी राम गोपाल वर्माने तेव्हा सगळ्यांना ओरडून सांगितलं असलं तरी हाच राम गोपाल वर्मा आता तीन वर्षांनंतर २६/११वर सिनेमा करतोय.
२६/११असं या सिनेमाचं सध्या नाव ठेवण्यात आलं असून या सिनेमामध्ये प्रत्येक घटनेचं चित्रण करण्याचा राम गोपाल वर्मा यांचा मानस आहे. तसंच या सिनेमामध्ये रितेश देशमुख कोणतीही भूमिका करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तर या सिनेमामध्ये नव्या कलाकारांना संधी देण्यात येणारेय. त्यासाठी ऑडिशन्सही घेण्यात येत आहेत. एकूणच तीन वर्षानंतरही राम गोपाल वर्माने हा विषय काही सोडलेला नाही. ही संवेदनशील घटना ते अखेर सिल्व्हर स्क्रीनवर आणण्यासाठी सज्ज झालेत.