www.24taas.com, कराची
२०१२ हे वर्ष बहुतेक सैफ अली खानसाठी त्रासाचं ठरणार आहे, असं दिसतंय. खरंतर सैफ अली खानचा महत्त्वाकांक्षी ‘एजंट विनोद’ जगभरात रिलीजसाठी सज्ज आहे. पण, तरीही दुर्दैवाने त्याची अजूनही पाठ सोडलेली नाही.
'एजंट विनोद' जगभरात रिलीज होणार असला, तरी पाकिस्तानात रिलीजपूर्वीच 'एजंट विनोद'वर बंदी घालण्यात आली आहे. कराचीमधील एका मल्टिप्लेक्स चेनकडून ही माहिती समजली आहे. पाकिस्तानी सेंसॉर बोर्डाने एजंट विनोदवर आक्षेप घेतला आहे. या सिनेमात पाकिस्तानबद्दल काही आक्षेपार्ह विधानं केली असल्याचं कारण यासाठी पुढे करण्यात आलं आहे.
यापूर्वीच हॉटेलमध्ये एका अनिवासी भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याबरोबर मारामारी करून सैफ अली खानने आपलं नाव खराब करून घेतलं. तसंच, भोपाळमध्ये आपल्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी भारतीयांच्या पोटावर पा देऊन सौदी अरेबियातून एक केयरटेकर आणल्यामुळे नवाबसाहेबांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला होता. आणि आता ‘एजंट विनोद’वर पाकिस्तानात बंदी घातली जात आहे. त्यामुळे नवाबसाहेबांचं काही खरं दिसत नाही...