हॉलिवूड सूपर स्टार टॉम क्रुझ मुंबई विमानतळाच्या बाहेर पडला तेंव्हा त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचं दृष्य तुम्ही पाहिलं असेलच. टॉम क्रुझने आपल्या चाहत्यांना हात उंचावून हसतमुखाने अभिवादन केलं आणि तो हॉटेलच्या दिशेने निघाला. त्यानंतर काही क्षणातच टॉमच्या या चाहत्यांना विमानतळावर हजेरीची बिदागी अदा करण्यात आली. एका वेब साईटने दिलेल्या वृत्तानुसार २०० लोकांना विमानतळावर चाहत्यांची भूमिका वठवण्याचे प्रत्येकी १५० रुपये मानधन देण्यात आलं.टॉम क्रुझचे आगमन झाल्यानंतर विमानतळावर चाहत्यांची भूमिका वठवण्यासाठी ज्युनिअर आर्टिस्टची व्यवस्था करण्याची जबाबदारी एका मॉडेल कोऑरडिनेटर सोपवण्यात आली होती. आता मजेची गोष्ट म्हणजे यापैकी अनेकांना टॉम क्रुझ कोण आहे याची काहीच कल्पना नव्हती.
एका ज्युनिअर आर्टिस्टने वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत टॉम कौन अशी विचारणा केली. तो पुढे म्हणाले की आम्हाला एक वाजण्याच्या सुमारास येण्यास तसंच व्हीआयपी गेटच्या बाहेर येण्याची वाट पाहण्यास सांगण्यात आलं होतं. व्हीआयपी गेटच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला किंचाळून आणि ओरडाआरडी करण्यासही सांगण्यात आलं होतं त्यासाठी १५० रुपये देण्यात आले. आमच्यासाठी बुफेची व्यवस्थाही करण्यात आली होती. आम्ही टेलिव्हिजन शो साठी आणि अनेक इव्हेंटसाठी जिथे गर्दीची आवश्यकता असते तिथे जाऊन हेच काम करतो.
आता भारतात टॉम क्रुझचे फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावर असल्याने खरे चाहते गोळा करणं अवघड गेलं नसतं तसंच त्यांना पैसेही मोजावे लागले नसतील. क्रुझ मिशन इम्पॉसिबल सिनेमाच्या प्रमोशनसाठी भारत दौऱयावर आला होता.