सलीम शाहीनचं नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता तशी अत्यल्पच. सलीम शाहीन हे म्हटलं तर एका वेड्या पीराचं नाव आहे. म्हणजे शब्दाश: तो पीर नाही. पण आधी सोविएत रशियाचं आक्रमण आणि त्यानंतर तालिबानचा वरवंटा फिरलेल्या अफगाणीस्तानात अनेक वर्षे सिनेमा निर्मिती करणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण आहे का ?
सलीम शाहीनला लहानपणीच बॉलिवूडच्या सिनेमांनी झपाटलं आणि तो सिने निर्मितीकडे वळला. सलीमने १९८४ साली जेंव्हा सिनेमा बनवायला सुरवात केली तेंव्हा त्याचे नातेवाईक म्हणाले की शाहीन दिवाना हो गया. खरतरं वयाच्या आठव्या वर्षी जेंव्हा ललकार सिनेमात धर्मेंद्र मरताना पाहिलं तेंव्हाच तो दिवाना झाला होता. सिनेमा पाहून परत येताना तो हमहमसून रडला होता. त्यानंतर सिनेमा हेच त्याच्या जगण्याचं प्रयोजन झालं. त्यामुळेच गेल्या तीस वर्षात अनंत अडचणींना तोंड देत त्याने असंख्य सिनेमे बनवले. अगदी १९९३ साली त्याच्या ऑफिसवर रॉकेट पडलं आणि त्याच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीसही आठ जण मारले गेले तरीही तो मागे सरकला नाही.
सलीम शाहीनने आपल्या सिनेमात हिरोची भूमिका करताना त्या व्यक्तिरेखेचं नाव बहुतेक वेळा कैस असतं. जसं आपल्या कडे अमिताभच्या व्यक्तीरेखेचं नाव विजय किंवा शाहरुखला राहुल चिकटलं तसंच. एकदा अफगाणीस्तानच्या उत्तर भागात काबूलचे बडे सिने निर्माते दिग्दर्शक एका ख्यातनाम कवी सोबत कार्यक्रमाला गेले होते. ही सर्व मंडळी ज्या गेस्टहाऊसवर उतरली होती तिथे प्रचंड गर्दी जमली त्यांना वाटलं की कवीमहाशयांना पाहिलं एवढ्या संख्येने लोकं आहेत. पण चौकशी केल्यानंतर हे सगळे कैसचं फॅनफॉलोईंग निघालं. ज्या देशात तालिबानने सिनेमा थिएटर बंद पाडली तिथे सलीम शाहीनने ही कला जीवंत ठेवली. अफगाणीस्तानात सर्वदूर शाहीनचे सिनेमे लोक आवडीने बघतात यातच सर्व काही आलं नाही का?