निव्वळ टाइमपास!-सिंघम

Updated: Aug 4, 2011, 07:53 AM IST

मेरी जरुरते कम है, इसलिए मुझमे दम है किंवा जिसमे है दम, तो फक्त बाजीराव सिंघम असे टाळीबाज डायलॉग, डिश्युम डिश्युमवाली फायटिंग, हिरोचे डोलेशोले, चुलबुली हिरॉईन आणि हिंस्त्र व्हिलन असा मसाला एकत्र येतो तेव्हा बॉलिवूडचा फॉर्म्युला सिनेमा तयार होतो. सिंघम हा सिनेमा बनवतानाही रोहीत शेट्टीने जास्त विचार केलेला दिसत नाही. वर्षानुवर्षं तयार असणारा हा ठराविक फॉर्म्युला उचलून त्याप्रमाणे ठोकळे एकमेकांवर बसवले आहेत. त्यामुळे त्याच पठडीची अपेक्षा ठेवून थिएटरमध्ये गेलेल्या प्रेक्षकाची निराशा होत नसली तरी, थिएटरबाहेर पडताना मनापासून दाद द्यावी असंही फारसं काही वाटत नाही.

सिंघम हा इतिपासून अथपर्यंत पुरेपूर मसालेपट आहे. गेल्या काही काळात साऊथच्या सिनेमांचं लोण झपाट्याने पसरतंय. प्रेक्षकांना सध्या त्या सिनेमांच्या स्टाईलने भुरळ घातली आहे. त्यामुळेच सिंघम हा जरी गेट सिनेमा नसला तरी या वाहत्या गंगेत हात धुऊन घेत या सिनेमाने प्रदर्शनाची नेमकी वेळ साधली आहे, ही गोष्ट निश्चित.

महाराष्ट्रातलं एक छोटं, सुखी, समाधानी, सुफळ गाव. त्या गावाने आपणहून नेतेपद देऊ केलेला गावाचा अनभिषिक्त सम्राट म्हणजे बाजीराव सिंघम उर्फ अजय देवगण. सगळं कसं छान, सुरळीत सुरू असतं. अचानक या गावावर एक संकट येतं आणि या सम्राटाची गाठ पडते एका दुष्टाशी. त्याला टक्कर द्यायला तो गोव्याला जातो. आणि मग तिथे सुरू होतो संघर्ष, सत्ता-शक्तीमधील चांगल्या आणि वाईट वृत्तीचा... वाईट प्रवृत्तीला धुऊन काढताना हिरोला काय काय यातना सहन कराव्या लागतात. मग तो काय युक्ती लढवतो... वगैरे घटनांनी हा सिनेमा रंगलाय.

अर्थात याच्या विषयात नावीन्य चवीसही नाही. पहिल्या अर्ध्या भागामध्ये तर अनेक खणखणीत दृश्यं आहेत, संवादही आहेत; पण त्यात प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा दम नाही. सिनेमाच्या पटकथेत फारसा जीव नसल्याने सगळे प्रसंग एकमेकांना जोडून घेतल्याप्रमाणे वाटतात. डायलॉग लक्षात राहात असले तरी त्यावर उत्फुर्त प्रतिसाद द्यावा असं फारच क्वचित वाटतं. या सिनेमामध्ये सलग असं कथानकच नाही. मसाले जोडून केलेला आणखी एक नवा मसाला एवढंच काय ते याबाबत म्हणता येईल. अजय देवगणचा अभिनय चांगला आहे. पोलिसाच्या दमदार भूमिका त्याला शोभतातदेखील. पण त्यात नावीन्य मात्र काहीच नाही. रोहीत शेट्टीनेच अजय देवगणला घेऊन केलेल्या गंगाजलमधला त्याचा पोलिसी खाक्या जसा अजूनही मनात ठसलाय तसा प्रभाव पाडायला सिंघम मात्र अयशस्वी ठरतो. शिवाय त्याचं मराठमोळं व्यक्तिमत्त्व असलं तरी त्याचं मराठी मात्र विनोदी वाटतं. काजोल अग्रवाल ही नवी अभिनेत्री साऊथ छाप असली तरी छान आहे. तिच्या वाट्याला असणारं थोडंफार काम तिने नेटकं पार पाडलंय. आता हा सिनेमा पाहायचाच असेल आणि त्यासाठी ठोस कारण हवं असेल तर ते आहे, या सिनेमाचा व्हिलन प्रकाश राज. अतिशय उत्कृष्ट क्षमता असणाऱ्या या अभिनेत्याने अक्षरश: सगळ्यांना खाऊन टाकलंय. केवळ डोळ्यांमधून समोरच्याचा थरकाप उडवायची क्षमता आणि त्यासोबतच प्रेक्षकाला दाद द्यावीशी वाटावी अशा व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटा त्याने इतक्या सहज उभ्या केल्यायत की मध्यंतरानंतर सिनेमा रंगतो तो केवळ त्याच्यामुळेच. अशोक समर्थनेही नकारात्मक भूमिका चांगली वठवलीय.

खरं सांगायचं तर हा सिनेमा नावाला हिंदी म्हणावा लागेल. त्याची हाताळणी, संकल्पना वगैरे साऊथ स्टाईल; तर कलाकारांच्या फौजेपासून ते संगीतापर्यंत आणि वातावरणापासून ते भाषेपर्यंत मराठीपणच जास्त आहे. हिंदी, कानडी, तामीळ, मराठी, कोकणी अशी राष्ट्रीय एकात्मता या सिनेमाच्या निमित्ताने पहायला मिळेल. अजय-अतुलचं संगीत छान. सिंघमच्या पटाला ते अस्सल मराठमोळ्या ठेक्याचं संगीत शोभून दिसतं आणि त्यामुळेच हा सिनेमा जास्त मराठी वाटतो. बाकी सोनाली कुलकणीर्, विकास कदम, मेघना वैद्य, अनंत जोग, अशोक सराफ, सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर इत्यादी मंडळींची मोठी फौज आहे. प्रत्येकजण आपापल्या जागी ठीक आहेत.

या सिनेमात अनेक गोष्टींचा ताळमेळ नाही. सिंघम हे नाव मराठीत असतं का इथपासूनच प्रेक्षकाला सिनेमा पाहताना प्रश्ान् पडायला लागतात. अर्थात अशा मसालेपटात या गोष्टींचा जास्त विचार करायची आवश्यकता नाही. पण दबंग, वाँटेडच्या वेळी जी मजा आली होती ती मजा या सिनेमामध्ये कुठेतरी हरवल्यासाठी वाटते हे निश्चितच. पण सध्याच्या ट्रेण्डमध्ये खपून जाणारा हा मसालेबाज सिनेमा टाईमपास म्हणून बघायला हरकत नाही.

Tags: