Winter Session Sanjay Raut: "महाराष्ट्र आणि देशभरात भाजपचं जे राजकारण आहे तेच राजकारण काल राज्यसभेत दिसलं. भाजप केंद्रीय तपास यंत्रणा वापरून राजकारण करत आहे हा सूर काल राज्यसभेत होता," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिलेली वागणूक पाहता त्यांचे पक्ष राहतील की नाही माहित नाही, असंही राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. "त्यांचं (एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं) बौद्धिक संघ मुख्यालय रेशीम बागेत होईल असं मी वाचलं. त्यांचं बौद्धिक दिल्लीत घेतलं जात आहे. आता त्याचा पक्ष विलीन व्हायचं बाकी आहे फक्त," असं राऊत म्हणाले.
दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, "अजित पवार यांचा गट स्थापन करण्यात भूमिका बजावणाऱ्या भुजबळ यांच्यासारखा नेत्यावर अशी वेळ आली आहे," असं राऊत म्हणाले. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्यांना राऊतांनी सूचक शब्दांमध्ये टोला लगावल्याचं पाहायला मिळालं. "शिंदे गटामध्ये मंत्रिपद मिळाली नाही ते रडत आहेत. मूळ शिवसेना पक्षात असं काही कधीच झालं नाही," असंही राऊत म्हणाले.
"भुजबळांचं (मंत्रिपदाच्या यादीतून) नाव कोणी कापलं हे माहीत नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. त्यांचं वय 79 वर्ष आहे. ते त्यांची लढाई लढतील, ते समर्थ आहेत. बेळगावमध्ये आंदोलन करणारे ते महत्वाचे नेते होते. ते 2 महिने जेलमधे राहिले होते," अशा शब्दांमध्ये राऊतांनी भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊतांनी, "जोरदार चर्चा करायला काही हरकत नाही. पण राज्याची एक वेगळी संस्कृती आहे. राज्यात नवं सरकार आलं आहे. त्यांनी चांगलं, राज्याचं काम करावं अशा शुभेच्छा द्यायला ते गेले होते. फडणवीस यांनी देखील शपथविधीसाठी सगळ्यांना फोन केला होता," अशी आठवणही राऊत यांनी करुन दिली. ठाकरे आणि फडणवीस यांची जवळपास 15 मिनिटं भेट झाली होती. त्यावरुनच राऊतांनी ही प्रतिक्रिया नोंदवली.
"तुम्ही कोणतं हिंदुत्व धरून ठेवलं आहे?" असा सवाल राऊतांनी विरोधकांना केला आहे. "बांगलादेशातील हिंदुत्ववर हल्ले होत आहेत. दादरजवळील हनुमान मंदीरावर बुलडोझर चालवला तेव्हा आम्ही तिथे उभे राहिलो," असंही राऊत म्हणाले.