www.24taas.com, मुंबई
७०च्या दशकातील भारतातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती गंभीर असून गेले तीन ते चार दिवस त्यांनी अन्न घेणं बंद केलं आहे. राजेश खन्ना यांचे मॅनेजर अश्विन यांनी सांगितलं, “राजेश खन्ना घरी आजारी आहेत. गेल्या ३-४ दिवसांत त्यांनी काहीही खाल्लेलं नाही. डिंपलजी सतत त्यांच्याजवळ बसून त्यांची काळजी घेत आहेत. आज त्यांना त्यांची मुलगी रिंकीदेखील भेटायला आली होती.”
६९वर्षीय राजेश खन्ना १९८२साली पत्नी डिंपलपासून विभक्त झाले होते. त्यांना ट्विंकल आणि रिंकी या दोन मुली आहेत. या आधी एप्रिलमध्ये प्रकृतीअस्वास्थ्यामुळे राजेश खन्ना यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं.
हिंदी सिनेसृष्टीमध्ये पहिलं सुपरस्टार हे बिरुद मिळवणाऱ्या राजेश खन्ना यांनी १५० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी सिनेमात अभिनय केलेला सिनेमा सुपरहिट होणारच हे अध्याहृत असे. राजेश खन्ना यांचे चाहते त्यांना ‘काका’ म्हणून संबोधतात. १९६० ते १९७० या काळात आराधना, आनंद, अमरप्रेम, सफर, बावर्ची इत्यादी अनेक सिनेमांमध्ये काम करून राजेश खन्ना यांनी लोकप्रियता मिळवली होती.