गडचिरोलीत जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम

गेल्या पाच वर्षातल्या कामामुळे तसंच केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचं सरकार असल्यामुळं यावेळीही गडचिरोली झेडपीत काँग्रेसची सत्ता येईल असा त्यांच्या नेत्यांना विश्वास वाटत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गृहमंत्री आर आर पाटील यांनी घेतली आहे.

Updated: Jan 27, 2012, 10:30 PM IST

आशिष आंबाडे,  www.24taas.com, गडचिरोली

 

दुर्गम, नक्षलग्रस्त, विकासापासून कोसो दूर अशा गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये गेली पाच वर्ष काँग्रेसची सत्ता आहे. २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण ५१ जागांपैकी २१ जागा राष्ट्रवादीला, ६ काँग्रेस, ७ शिवसेना, ५ भाजप तर अपक्ष आणि इतरांना १२ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून त्यांचे आठ सदस्य काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसने शिवसनेच्या मदतीनं झेडपीत सत्ता मिळवली.

 

गेल्या पाच वर्षातल्या कामामुळे तसंच केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचं सरकार असल्यामुळं यावेळीही गडचिरोली झेडपीत काँग्रेसची सत्ता येईल असा त्यांच्या नेत्यांना विश्वास वाटत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गृहमंत्री आर आर पाटील यांनी घेतली आहे. त्यांनीही गडचिरोली झेडपीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसली आहे.

 

तर गेल्या पाच वर्षाच्या झेडपीतल्या कारभाराला कंटाळलेली जिल्ह्यातली जनता भाजपच्या पारड्यात मतं टाकेल असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. युवा शक्ती संघटनाही अहेरी तालुका वगळता इतरत्र उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळं प्रस्थापित पक्षांना या संघटनेचं आव्हान मिळणार आहे. मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात हे काही दिवसातच स्पष्ट होईल.