www.24taas.com वेब टीम
अनुज बिडवेचा मृतदेह करोनरने लंडनमधल्या अंत्यसंस्कार व्यवस्था करणाऱ्या एका कंपनीकडे सुपूर्द केला आहे. अनुज बिडवेच्या मृतदेहाचे दुसरं शवविच्छेदन काल करण्यात आलं होतं. अनुजचा मृतदेह आता भारतात लवकर आणता येईल. अनुजचे वडिल आणि त्याचे नातेवाईक आज मृतदेह ताब्यात घेण्यासाठी लंडनला पोहचत आहेत.
अनुजचे वडिल आणि नातेवाईक सॅलफोर्डला भेट देण्याची शक्यता आहे. अनुजची बॉक्सिंग डे च्या दिवशी सॅलफोर्ड इथे हत्या करण्यात आली होती. अनुज लँकास्टर विद्यापीठात मायक्रो इलेक्ट्रॉनिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी होता. विद्यापीठाने अनुजने भरलेली संपूर्ण फी परत करु असं बर्मिंगहँम येथील भारतीय दुतावासातील अधिकारी आर.आर.स्वेन यांना कळवलं आहे. तसंच बिडवे सोबत असलेल्या विदर्थ्यांची सर्व प्रकारची काळजी घेऊ असंही आश्वासन दिलं आहे. बिडवे कुटुंबियांनी अनुजची फी भरण्यासाठी घर तारण ठेवून कर्ज घेतलं आहे. अनुजचा मृतदेह भारतात आणण्यासाठी त्याचे वडिल आणि नातेवाईक लंडनमध्ये दाखल झाले आहेत.
लंडन पोलिसांचे एक पथक पुण्यात अनुजच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलं होतं. त्यावेळेस अनुजच्या हत्येची माहिती देण्यास विलंब लागल्याबद्दल त्यांनी अनुजच्या कुटुंबियांची माफी मागितली आणि मृतदेह लवकरात लवकर ताब्यात मिळण्यासाठी सर्व प्रकारचं सहाय्य उपलब्ध करुन देऊ असं आश्वासनही दिलं.