आंबेडकरांच्या कार्टूनवरून संसदेत हंगामा

सीबीएसईच्या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त कार्टून हटवण्यात येणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिले आहे. सीबीएसईच्या 11 वीच्या पुस्तकात आंबेडकरांच्या कार्टुनवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला.

Updated: May 11, 2012, 03:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

सीबीएसईच्या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वादग्रस्त कार्टून हटवण्यात येणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिले आहे. सीबीएसईच्या 11 वीच्या पुस्तकात आंबेडकरांच्या कार्टुनवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला.

 

 

लोकसभेत  अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी एल पुनिया यांनी या कार्टूनवर आक्षेप घेत  मुनष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांच्या माफीची आणि राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोधकांनीही समर्थन देत काँग्रेसवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडं बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीही ही गंभीर चूक असून खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा देत सिब्बल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर अडचणीत आलेल्या सरकारनं लगेचच याबाबत कारवाईचं आश्वासन देत कार्टून मागे घेण्याचं आश्वासन दिले आहे.

 

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्टून छापल्यावरुन  सभागृहाचं कामकाज सुरु होताच लिबरेशन पँथर पक्षाचे खासदार थिरुम्मा वालावन थोल यांनी आंबेडकरांचा अपमान झाल्याचं म्हटले आहे. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत अनेक खासदारांनी या प्रकाराला आक्षेप घेत संसदेत गदारोळ घातला. या प्रकरणावर उत्तर देण्यासाठी उभ्या असलेल्या कपिल सिब्बल यांनाही बोलण्याची संधी विरोधकांनी दिली नाही. यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावे लागले.