आर्थिक आरिष्टात सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला सरकारकडून कोणत्याही स्वरुपाचे सहाय्य मिळण्याची शक्यता नागरी उड्डाण मंत्री वायलर रवी यांनी फेटाळून लावली. पण किंगफिशला आर्थिक सहाय्या मिळण्यासाठी बँकाकडे जाण्याची मूभा असल्याचं वायलर रवी यांनी सांगितलं.
किंगफिशरच्या व्यवस्थापनाने मदतीच्या याचनेसाठी भेट घेतल्याचं रवी यांनी सांगितलं. पण यासंदर्भात त्यांना अर्थमंत्री प्रणब मुखर्जींशी बोलायला सांगितल्याचं ते म्हणाले. अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यासदंर्भात बँकाशी बोलण्याची शक्यता आहे पण सरकार किंगफिशरला आर्थिक सहाय्य देण्याच्या वृत्ताचा रवी यांनी इनकार केला. किंगफिशरच्या शेअर्समध्ये १९ टक्क्यांची घसरण झाली.
गेले पाच दिवस सलगपणे किंगफिशरच्या शेअर्सच्या किंमतींमध्ये घसरण होत आहे. किंगफिशरला २०१०-११ या आर्थिक वर्षात १०२७ कोटी रुपयांचा तोटा झाला आणि ७०५७ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा कंपनीवर चढला आहे. किंगफिशचे मालक विजय मल्यांनी बँकांकडून कमी व्याज दरात भांडवल मिळावं यासाठी तातडीने अर्थमंत्री प्रणब मुखर्जी आणि नागरी उड्डाण मंत्री वायलर रवी यांची भेट घेतली. एअर इंडिया प्रमाणे किंगफिशरला सवलती मिळाव्यात अशी मागणीही विजय मल्यांनी केल्याचे समजते. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांनी किंगफिशरला इंधनाची देयकं भागवण्यासाठी क्रेडिट नाकारलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जवळपास १०० हून अधिक वैमानिकांनी किंगफिशरला राम राम ठोकला आहे.