'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय.

Updated: Jul 26, 2012, 08:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय. त्यातच बाबा रामदेव यांनीही आज य़ा आंदोलन ठिकाणी येण्याचं टाळलंय.

सशक्त लोकपाल आणि केंद्र सरकारमधील 15 भ्रष्ट मंत्र्यांच्याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी टीम अण्णाने मोठा गाजावाजा करत दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषणं सुरु केलं खरं. बुधवारी आंदोलनस्थळी ब-यापैकी गर्दी होती. मात्र गुरुवारी दिल्लीकरांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. टीम अण्णाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणहून दस्तुरे खुद्द अण्णा हजारेही दिल्लीत दाखल झाले, त्यांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारत उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. पण जंतरमंतरवर आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. जी काही गर्दी आहेत, त्यात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेचे कार्यकर्तेच मोठ्या संख्येनं होतं..

 

त्यातच बाबा रामदेवांनीही या आंदोलनस्थळी येण्याचं टाळलंय. तर सरकारकडूनही या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी तर टीम अण्णा असमाधानी असल्यास थेट संयुक्त राष्ट्रसंघाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर टीम अण्णाचा हा फ्लॉप शो आहे काय, अशी चर्चा दिल्लीत सुरु झालीय.