www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन डी तिवारी यांचा डीएनए रिपोर्ट आज जाहीर होण्याची शक्यता आहे. ३२ वर्षीय रोहीत शेखरनं एन डी तिवारी हे आपले पिता असल्याचा दावा दाखल केलाय.
रोहीत शेखरचं पितृत्व नाकारणाऱ्या नारायण दत्त तिवारी यांचा डीएनए चाचणीचा अहवाल आज सर्वांच्या समोर येऊ शकतो. हायकोर्टाच्या एका खंडपीठानं मागच्या आठवड्यात २७ जुलै रोजी हा अहवाल कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर एन डी तिवारींनी एक याचिका दाखल करून हा अहवाल जाहीर करू नये अशी मागणी केली होती. काँग्रेस नेते एन. डी. तिवारी यांनी आपल्या प्रतिष्ठेचा मुद्दा पुढे करून आपल्या हक्कांची मागणी करत हा अहवाल जाहीर करू नये, अशी मागणी केली होती. पण, आज कोर्टानं तिवारींची ही याचिका फेटाळून लावलीय. त्यामुळे आज तिवारींचा डीएनए रिपोर्ट जाहीर होण्याची शक्यता आहे. रोहीत शेखरचा आणि रोहीतची आई उज्ज्वला शर्मा यांनी तिवारीच शेखरचे पिता असल्याचा दावा केलाय. डीएनए अहवालामुळे शेखरचा दावा खरा आहे की खोटा हे सिद्ध होणार आहे.
८७ वर्षीय तिवारी यांनी डीएनए चाचणी करतानाही ‘वय जास्त झाल्यामुळे आपण रक्त देऊ शकत नाही’ अशी सबब पुढे केली होती. यावेळी न्यायालयानं त्यांना चांगलंच फटकारलं होतं. तसंच २५ हजार रुपयांचा दंडही भरण्याचे आदेश कोर्टानं तिवारींना दिले होते. आता त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलंय की, ‘हा खटला दिल्ली हायकोर्टाच्या अधिकारक्षेत्रात येतो की नाही याचाही निर्णय अजून कोर्टानं घेतलेला नाही. अशावेळी डीएनए अहवाल जाहीर करणं हा माझ्यावर अन्याय ठरेल. कोर्टाच्या अधिकारक्षेत्राचा निर्णय होईपर्यंत हा अहवाल जाहीर केला जाऊ नये.’ दिल्लीचा रहिवासी असणाऱ्या रोहित शेखरनं तिवारींच्या या याचिकेला विरोध केलाय.
।