www.24taas.com, कोलकता
यूपीएमधील तृणमूल काँग्रेसच्या सातही मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते सुदीप बंडोपाध्याय यांनी आज स्पष्ट केले. परंतु, राजीनामे दिले नसले तरी राजीनामे तयार असल्याची गुगली बंडोपाध्याय यांनी टाकून पुन्हा यूपीएचे दात घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून आता तृणमूल काँग्रेसने काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यूपीए सरकारमधील तृणमूल काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपवले आहेत, अशी बातमी समोर आली. त्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले. त्यानंतर राजीनाम्याचे खंडन करत तृणमूलने काही काळ या बातमीतील हवा काढली होती. मात्र, दुसऱ्याच क्षणी राजीनामे तयार असल्याचे सांगून धक्काच दिला.
कलामच राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचा पुनर्रुच्चार बंडोपाध्याय यांनी केला. कलाम यांना राजी करण्याचा प्रयत्न करू असे बंडोपाध्याय यांनी सांगितले.
दरम्यान माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. कलामांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ते निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच त्यांनी राजकीय पक्ष आणि जनतेचेही आभार मानलेत.
याआधी त्यांना भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दुरध्वनी केला होता. तेव्हाही कलामांनी, निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं होतं. एकंदरीतच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी कलामांचं मन वळवण्यात एनडीएला अपयश आलंय. ममता बॅनर्जींचे आभार मानत असल्याचंही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केलंय.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेत्यांनी विनंती केली होती. मात्र अंतरात्मा परवानगी देत नसल्यानं निवडणूक लढवत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.