www.24taas.com, नवी दिल्ली
राजधानी नवी दिल्लीत ५२ वा ‘महाराष्ट्र दिन’ विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदन येथे साजरा करण्यात आला. प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी यावेळी ध्वजारोहण केले.
महाराष्ट्र सदन येथे महाराष्ट्र परिचय केंद्रासह दिल्लीतील विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई, आमदार उल्हास पवार, माजी आमदार अनिस अहमद, अपर निवासी आयुक्त प्रदीप कुमार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानीत विविध कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी महाराष्ट्र डेव्हलप्मेंट ऍन्ड प्रमोशन सेन्टरतर्फे एक दिवसाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘देऊळ’ चित्रपटाचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले होते. दिल्लीतील सार्वजनिक उत्सव समितीतर्फे दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक निर्मित ‘माझ्या मातीचे गायन’ हा कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचा छंदोबद्ध गायनाचा कार्यक्रम झाला.