झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
आधीच महागाईच्या आगीत होरपळलेल्या जनतेवर सहा महिन्यांत चौथ्यांदा पेट्रोलची दरवाढ करुन आणखी एक पेट्रोल बॉम्ब टाकला आहे. आज मध्यरात्रीपासूनच पेट्रोलचे दर तीन रुपये १४ पैशांनी वाढतील. आता पेट्रोलचा दर ७१ रु.७६ पै. इतका असेल. सरकारनं पेट्रोल भाव नियंत्रणमुक्त केल्यापासून सतत भाववाढ होत आहे. आज पेट्रोल कंपन्यांच्या बैठकीत दरवाढीचा हा निर्णय घेण्यात आला.
या दरवाढीने सरवसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे. गेली काही वर्षं महागाई वाढतच असताना पेट्रोल आणि डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहेत. नियंत्रण नसल्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव वाढताच देशातही भाव वाढत आहेत.
प्रत्येक वेळी दरवाढीनंतर विरोधी पक्ष निषेध करतात. निदर्शनं करुन आंदोलनाची औपचारिकता पार पाडतात. दुसरीकडे नियंत्रण उठवल्यामुले सरकारही भाववाढ अपरिहार्य असल्याचं सांगत वेळ मारुन नेत आहे. या सगळ्यात सामान्य जनता मात्र होरपळून निघते. कदाचित यावेळीही हेच घडेल. आणि यातून सावरण्यापुर्वीच पुढच्या भाववाढीची बातमी येईल.