भ्रष्टाचारविरोधी युद्ध सुरुच राहणार - अडवाणी

भ्रष्टाचारविरोधी युद्ध सुरुच राहणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी जनयात्रेच्या समारोप प्रसंगी केले.

Updated: Nov 20, 2011, 11:24 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

भ्रष्टाचारविरोधी युद्ध सुरुच राहणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी जनयात्रेच्या  समारोप प्रसंगी केले.

 

भ्रष्टाचारविरोधी देशभरात जनचेतना यात्रा  लालकृष्ण अडवाणी  यांनी  काढली होती.  रामलिला मैदानावर झालेल्या सभेत एनडीएतील आठ पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अडवाणी यांनी यात्रेदरम्यान आलेले अनुभव सांगितले. आपल्या ६० वर्षांच्या राजकारणात एवढा जनतेचा पाठींबा प्रथमच मिळाल्याचे ते म्हणाले. तमिळनाडू, केरळसारख्या राज्यांत पक्षाचा प्रभाव नसला तरी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्याचे  त्यांनी सांगितले.

 

मी आतापर्यंत सहा यात्रा केल्या आहेत. मात्र, या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी ही यात्रा ठरली. मात्र, या यात्रेदरम्यान मला आमचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची उणीव जाणवली. भ्रष्टाचाराचे समाजातून उच्चाटन होणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारात अडकल्यामुळे केंद्र सरकारमधील एक पाठोपाठ एक मंत्री हटविण्यात आले, पण सरकारवर याचा काही परिणाम झालेला नाही. भ्रष्टाचार रोखण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात येत नाही, असे अडवाणी सांगितले.

 

काळ्या पैशाच्या बाबतीतही सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एनडीए लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार अध्यक्षांना 'माझे भारताबाहेरील आणि भारतातील कोणत्याही बँकेत अवैध पैसे नाहीत' असे लिहून देणार आहेत. सरकारनेही यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. भारताच्या राजकारणात मनमोहन सिंग हे आतापर्यंतचे सर्वात कुमकुवत पंतप्रधान आहेत, अशी टीका  अडवाणी यांनी केली.