उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षानं माजी मुख्यमंत्री मायावती यांचा जेवर इथला महत्त्वकांक्षी विमानतळ प्रोजेक्ट रद्द केला आहे. गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर इथे तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी आपल्या कार्यकालात ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ योजनेचा प्रस्ताव मांडला होता. या योजनेला केंद्राकडून परवानगी मिळाली नसल्याचं सांगत प्रस्तावाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
काही सरकारी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, “ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय हा केंद्राचा नसून राज्यसरकारचा आहे. आणि त्यामुळेच केंद्राकडूनही हा प्रस्ताव बारगळण्यात आला आहे. आणि आता आग्रा आणि मथुरा दरम्यान एक आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवण्याच्या योजनेवर काम सुरूही झालं आहे. या नवीन योजनेसाठी जमिन निश्चित करण्याची प्रक्रिया पुढच्या एका महिन्यात पूर्ण होईल. आणि त्यानंतर जमीन अधिग्रहणाचं काम सुरू होईल.”
नियमानुसार दोन विमानतळांमधलं अंतर १५० किलोमीटरपेक्षा जास्त असायला हवं. पण, जेवर इथलं प्रस्तावित विमानतळ नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १०० किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर होतं, कदाचित त्यामुळेही जेवर विमानतळाचा प्रस्ताव फेटाळला गेला असावा.