वादग्रस्त अभिनेत्री लैला खान हिची कुटुंबीयांसह हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती पुढे आलीय. लैलाच्या सावत्र वडिलांना जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं ही धक्कादायक माहिती दिली. विशेष म्हणजे संपत्तीसाठी लैलाचा बॉयफ्रेंड आणि सावत्र वडिलांनी ही हत्या केल्याची शक्यता आहे.
राजेश खन्नाबरोबरच्या वफा सिनेमातील हॉट सीनमुळे चर्चेत आलेली आणि दीड वर्षापूर्वी रहस्यमयरित्या गायब झालेली अभिनेत्री लैला खान हिची तिच्या आई आणि बहिणीसह हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. आणखी धक्कादायक बाब अशी की लैलाचा बॉयफ्रेंड आणि तिच्या आईच्या दुसऱ्या नवऱ्यानं संपत्तीसाठी हे हत्याकांड घडवल्याची माहिती मिळतेय. लैलाची आई सेलिना खान हिनं ज्याच्याशी तिसरं लग्न केलं होतं त्या परवेझ टाक याला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केल्यानंतर लैलाच्या हत्येचं गूढ उलगडू लागलंय. लैलाच्या नावावर असलेली ३ कोटी रुपयांची संपत्ती विकण्याचा लैलाच्या आईचा इरादा होता. त्यामुळे परवेझ टाक यानं ही माहिती लैलाचा बॉयफ्रेंड अफगान खान आणि आसिफ शेख यांना दिली. हे सगळेजन आपल्याच पैशावर मजा मारत असल्याची दूषणे लैलाची आई देत असल्यानं त्यांचा राग होताच. त्यातही संपत्तीही हातातून जाईल या संशयामुळे अफगान आणि आसिफ यांनी मुंबईजवळच्या जंगलात लैला, तिची आई आणि बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह पुरल्याची माहिती परवेझनं पोलिसांना दिल्याचं कळतं. दीड वर्षापूर्वी लैला आणि कुटुंबीय इगतपुरीच्या फार्म हाऊसमधून गायब झाले होते. दिल्ली बॉम्बस्फोटात लैलाच्या कारचा वापर झाल्यानं तिचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे एटीएसच्या पथकानं थेट काश्मीरपर्यंत तिचा माग काढला. लैला पोलिसांच्या हाती लागली नाही, पण परवेझ टाक हाती लागला आणि लैलाच्या हत्येचं गूढ उकललं. पण पोलीस आता याबाबत सत्यता पडताळून पाहतायत. लैलाची खरंच हत्या झालीय की या प्रकरणात आणखी काही काळंबेरं आहे हे पोलिसांच्या तपासात पुढे येईल.