www.24taas.com, नवी दिल्ली
राज ठाकरेंच्या कौतुक सोहळ्यावरून टीम अण्णांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राज यांच्या कृष्णकुंजवर जाऊन काल अण्णांनी राज यांचं तोंडभरून कौतुक केल्यानं टीम अण्णांचे सदस्य प्रशांत भूषण नाराज झाले आहेत. राज यांची कार्यपद्धती, राज ठाकरे यांचे 'राज'कारण आपल्याला मान्य नसल्याचं वक्तव्य प्रशांत भूषण यांनी केलं आहे. त्यामुळं टीम अण्णांमध्ये राज ठाकरेंवरून टोकाची मतं पुढं आल्याचं चित्र दिसते आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे हे देखील टीम अण्णांबाबत जरा साशंकच आहेत. अण्णांनी आपल्या सहकाऱ्यांबाबत विचार केला पाहिजे. त्यांच्यामुळे अण्णांच्या आंदोलनावर टीका होत आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आधी महाराष्ट्रात अण्णांनी लक्ष दिले पाहिजे. सक्षम लोकपाल येण्याची गरज आहे. त्यासाठी आमचा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. राज्याचा मुख्यमंत्रीही लोकपालच्या कक्षेत असायला हवा, ही आमची भूमिका आहे, असे राज ठाकरे यांनीही स्पष्ट केले होते.
राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांवेळी उमेदवारांची घेतलेली परीक्षा हे उत्तम होते. त्यामुळे गुंड, चारित्र्यहिन उमेदवार राजकारणात येणार नाही. राज ठाकरे यांनी पक्षाचा आम्हाला लोकायुक्त कायद्यासाठी पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले आहे असं देखील अण्णा हजारे यांचे म्हणणं आहे.