सूर्यनमस्कार इस्लामविरोधी, मुस्लिमांचा फतवा!

स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त मध्य प्रदेश सरकारने सर्वाधिक सूर्य नमस्कार घालण्याच्या जागतिक विक्रमाची नोंद व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु केले असले तरी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी त्या विरोधात फतवा जारी केला आहे.

Updated: Jan 11, 2012, 05:30 PM IST

www.24taas.com, भोपाळ
 स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त मध्यप्रदेश सरकारने सर्वाधिक सूर्य नमस्कार घालण्याच्या  जागतिक विक्रमाची नोंद व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु केले असले तरी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी त्या विरोधात फतवा जारी केला आहे.

 

सूर्य नमस्कार घालणे हा मूर्ती पूजेसारखाच प्रकार असल्याने ते इस्लामच्या विरोधात आहे आणि त्याला इस्लामनुसार मनाई असल्याचं मुस्लिम नेत्यांचे म्हणणं आहे. मुस्लिम नेतृत्वाने त्या विरोधात फतवा जारी केला आहे.  शहर काझी सय्यद मुश्ताक अली नदवी यांनी त्यावर शिक्कामोर्तबही केलं आहे.

 

मध्यप्रदेश सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सर्वाधिक सूर्य नमस्कारांच्या विक्रमांची नोंद गिनीज बुक होण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांना सूर्य नमस्काराच्या उपक्रमात अधिकाअधिक मुलांना सहभागी करुन घेण्याच्या संदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सहभाग अनिवार्य नसल्याचं स्पष्टीकरण जारी केलं आहे.

 

मध्य प्रदेशच्या शालेय शिक्षण मंत्री अर्चना चिटणीस यांनी पत्रकारांना सांगितलं की, प्रकृती स्वास्थ सुधारण्यासाठी सूर्य नमस्कार हा योग व्यायामाचा प्रकार आहे. आणि ज्यांना यात रस नसेल त्यांना त्यात सहभागी न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सूर्य भगवा किंवा हिरवा नसल्याची टिपण्णीही त्यांनी केली. मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी मात्र शिक्षणाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न असल्याचा म्हटलं आहे.