www.24taas.com, नवी दिल्ली
भारतातील बहुसंख्या काळा पैसा हा स्विस बँकेमध्ये गुप्त ठेवला गेला आहे. हा पैसा काही अंशी परत यावा, यासाठी केंद्र सरकारने नवा प्रस्ताव समोर ठेवला आहे. भारतातील जवळपास ४५लाख कोटी रुपये एवढा काळा पैसा स्विस बॅकेच्या लॉकरमध्ये आहे. स्विस बँकेतील 100 खातेदारांना केंद्र सरकारने सशर्त माफीचा प्रस्ताव ठेवला आहे. विदेशात दडलेला काळा पैसा परत आणण्याचा भाग म्हणून या प्रस्तावाकडे पाहिले जात आहे.
एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, पीएलसीच्या एचएसबीसी बॅँकेच्या जिनेव्हा शाखेतून पैसे काढून ते भारतात जमा करावेत, असे करचोरी करणार्या नागरिकांना सांगण्यात आले आहे. या रकमेवर कर भरण्यात यावा, त्याबदल्यात आयकर विभाग त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कारवाई करणार नाही. हा विभाग दंडही वसूल करणार नाही. विदेशातील बॅँकेत किती भारतीय खातेदार आहेत, याची माहिती सरकारने उघड केली नाही. फ्रान्स अधिकार्याने गेल्यावर्षी भारताला सोपविलेल्या यादीत 700 नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. यातील 100 लोकांना माफीचा प्रस्ताव देण्यात आला असून उर्वरित लोकांची चौकशी केली जात आहे.
माफी प्रस्तावाबाबत टॉरस अँसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकिय संचालक आर. के. गुप्ता म्हणाले की, विदेशातून काळा पैसा आणणे ही जागतिक समस्या आहे. त्यामुळे हा व्यावहारिक प्रस्ताव आहे. कर चुकवेगिरी करण्यासाठी विदेशात पैसा दडवणार्या नागरिकांचा शोध घेणार्या अमेरिका, इंग्लंड आदी देशांमध्ये भारताचा समावेश आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात भारतीयांनी 45 लाख कोटींचा काळा पैसा विदेशात ठेवल्याचे म्हटले आहे.