हमीद अन्सारींना राष्ट्रपती करा- लालूप्रसाद

जुलै महिन्यात प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. कलामांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता लालू प्रसाद यादव यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनाच राष्ट्रपती करण्याची मागणी केली आहे.

Updated: Apr 24, 2012, 12:41 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

जुलै महिन्यात प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. कलामांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता लालू प्रसाद यादव यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनाच राष्ट्रपती करण्याची  मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतली चूरस आणखीनच वाढणार आहे.

 

माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनाही राष्ट्रपतीपदासाठी पसंती दिली जाते आहे. त्यांचं नावही आघाडीवर आहे. दुसरीकडे उमेदवार जाहीर झाल्यावरच आपला पाठिंबा कुणाला ते कळवू अशी भूमिका मायवतींनी घेतली आहे. तर हमीद अन्सारी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे  उमेदवार होते त्यामुळं साहजिकच आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही ते काँग्रेसचेच उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित हेच गृहीत धरून लालुंनी आपला पाठिंबा हमीद अन्सारींनाच असल्याचं जाहीर केलं आहे.

 

प्रणव मुखर्जींचे नावही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत होते. तर ए. पी. जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपतीपदासाठी भाजपचे उमेदवार होते. आता कलाम आणि अन्सारी या दोन्ही मुस्लिम व्यक्ती राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत असल्यामुळं या दोन्ही नावांना इतर पक्ष कसा पाठिंबा देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राष्ट्रपदीपदासाठीचा उमेदवार हा राजकीय नसावा असं मत मांडल्यानंतर सर्वच पक्ष काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे.