www.24taas.com, अहमदाबाद,
आपल्याला ‘एसआयटी’ रिपोर्ट मिळावा, यासाठी गुलबर्ग सोसायटी दंगा प्रकरणातील पीडित जाकिया जाफरी यांनी पुन्हा एकदा अहमदाबाद कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. याआधी आपल्याला दिल्या गेलेल्या एसआयटी रिपोर्टमधील २० महत्त्वाची कागदपत्रं गहाळ असल्याची त्यांनी तक्रार केली आहे.
गुलबर्ग दंगा प्रकरणाच्या तपासणीची जबाबदारी सुप्रीम कोर्टानं ‘एसआयटी’कडे सोपवली आहे. गेल्या सोमवारी जाकिया जाफरी यांना एसआयटीकडून तपासणीचा भला मोठा अहवाल सोपवण्यात आला होता. २००२ च्या गोध्रा हत्याकांडानंतर गुलबर्ग सोसायटीत झालेल्या दंग्यात तक्रारकर्त्या जाकिया यांचे पती आणि माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासोबत ६९ लोक मारले गेले होते. या प्रकरणी जाकिया यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत अन्य ५७ जणांवर दोषी असल्याचा आरोप केला होता. जाफरी यांना सोपवलेल्या ५४१ पानांच्या अहवालात काही महत्त्वाची कागदपत्रं नाहिशी झाली आहेत. त्यामुळेच त्यांनी हा अहवाल आपल्याला परत आणि पूर्ण मिळावा, यासाठी याचिका दाखल केली आहे.