योजनांचा विचार की गांधी घराण्याचा प्रचार?

देशातील २५ टक्क्यांहून अधिक योजनांना स्वर्गीय राजीव गांधींचंच नाव देण्यात आल्याचं माहिती नियोजन आयोगाचे राज्य मंत्री अश्वीनी कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

Updated: May 10, 2012, 05:55 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

देशातील २५ टक्क्यांहून अधिक योजनांना स्वर्गीय राजीव गांधींचंच नाव देण्यात आल्याचं माहिती नियोजन आयोगाचे राज्य मंत्री अश्वीनी कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.  देशात नामवंतांच्या नावे सुरू केलेल्या ५८ योजना असून त्यातील १६ योजनांना तर फक्त राजीव गांधींचंच नाव देण्यात आलं आहे.

 

 

राजीव गांधी आवास योजना, राजीव गांधी उद्यमी मित्र योजना, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, राजीव गांधी राष्ट्रीय अनुसुचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अनुदान योजना इ. योजनांना राजीव गांधींचंच नाव देण्या आलं आहे.

 

 

देशात अनेक नामवंत कर्तबगार व्यक्ती असूनही सर्वाधिक योजना या राजीव गांधींच्याच नावे असण्यामागे गांधी घराण्याचा शासनावरील पगडा हेच कारण असल्य़ाचं म्हटलं जात आहे. कारण, राजीव गांधींच्या नावे १६ योजना असताना आणखी ८ योजना या इंदिरा गांधींच्या नावे केल्या आहेत. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना, इंदिरा गांधी निवास योजना, वयोवृद्धांसाठी चालवण्यात येणारी इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना  अशा ८ योजना इंदिरा गांधीच्या नावावर आहेत.

 

 

उर्वरीत योजनांना महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु यांची नावं देण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर, राजा राम मोहन रॉय, बाबासाहेब अंबेडकर. लाल बहाद्दुर शास्त्री, झाकीर हुसेन, मौलाना अबद्दुल कलाम आझाद, महर्षी संदीपीनी, खुदा बक्श यांच्या नावानेही सरकारी योजना चालु असल्याचे कुमार यांनी सांगीतले. या शिवाय बाबु जगजीवन राम, सरदार वल्लभभाई पटेल, राणी लक्ष्मीबाई, कस्तुरबा गांधी, घानी खान चौधरी, संत लॉगवाल, पंडीत द्वारका प्रसाद मिश्रा, सत्यजीत रे यांच्या नावानेही काही योजना सुरू केल्या गेल्या आहेत. भाजपा नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने केवळ एक संस्था सुरू करण्यात आली आहे.