www.24taas.com,परभणी
परभणी महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांना मदतीला घेतले तरी एका जागेसाठी काँग्रेस, शिवसेना , भाजपची साथ घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सत्तेसाठी राष्ट्रवादीला कसरत करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीने ६५ पैकी सर्वाधिक म्हणजे ३० जागा जिंकल्या आहेत. मात्र, मॅजिक फिगरचा आकडा ३३ आहे. त्यामुळे सत्तेसाठी अन्य पक्षाची मदत घ्यावी लागेल. कॉंग्रेसने २३ जागांवर विजय मिळविला आहे. शिवसेना ८, भारतीय जनता पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. बंडखोर आणि अपक्षांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. केवळ दोघांनाच यश मिळवता आले.
महापालिकेच्या ३२ प्रभागांतील ६५ जागांसाठी ५८टक्के मतदान झाले होते. त्यामुळे प्रमुख टक्कर असलेल्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी बहुमताचे दावे सोडून दिले आणि सर्वाधिक जागा मिळतील, असे दावे केले. या दाव्यांत राष्ट्रवादीने बाजी मारली. आता सत्तेच्या चावीसाठी काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.