झी 24 तास वेब टीम, उस्मानाबाद
उस्मानाबादमधल्या महाजन कुटुंबीयांच्या वडिलोपार्जित जमीनीत आता दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनीही हिस्सा मागितला आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश महाजन यांनीही हिस्सा मागितला होता. सध्या ही जमीन ट्रस्टच्या ताब्यात असून पूनम राव तिच्या ट्रस्टी आहेत.भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या उस्मानाबादमधल्या या जमिनीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनीही या जागेत हिस्सा मागितलाय.
महाजन कुटुंबाची ही वडिलोपार्जीत 3 एकर 24 गुंठे जमीन 2003 मध्ये 'तपस्वी चॅरीटेबल ट्रस्ट'ला देण्यात आली होती. मात्र जमीन ट्रस्टला देताना वारसांची संमत्ती घेण्यात आली नव्हती असा दावा सारंगी महाजन यांनी केलाय.
महाजन कुटुंबीयांच्या या जागेवर सध्या शाळेची इमारत असून प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम राव सध्या ट्रस्टची विश्वस्त म्हणून काम करत आहे. वर्षभरापूर्वी प्रकाश महाजन यांनीही या जागेत हिस्सा मागितला होता. आता सारंगी यांनी हिस्सा मागितल्यानं हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.