www.24taas.com, सिंधुदुर्ग
मुंबई महापालिकेवर विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्गातल्या पाट-परुळे इथल्या रवळनाथाच्या चरणी नवसपूर्ती केली. उद्धव यांच्यासह मनिल परब, विनायक राऊत, महापौर सुनिल प्रभू यांनीही रवळनाथाचं दर्शन घेतलं.
दरम्यान, याआधीसुद्धा पालिकेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांसह कार्ला इथल्या एकविरा आईचं दर्शन घेत नवस फेडला होता. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आज वेंगुर्ल्यात गेले होते. सकाळी दहाच्या सुमारास ते वेंगुर्ल्यात दाखल झाले. इथं त्यांनी रवळनाथाच्या मंदिराला भेट दिली.
महापालिकेत मिळालेल्या विजयाचा नवस फेडण्यासाठी ते इथं आले होते. फक्त दोन तासांचा हा दौरा होता. नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र अलिकडे सिंधुदुर्गात पुन्हा शिवसेना वाढते आहे. राणेंच्या मालवणातही सेनेनं नगरपालिकेत खातं खोललं आहे. या पार्श्वभुमिवर हा दौरा महत्वपूर्ण होता.