गणपतीपुळे देवस्थान कमिटीवर भ्रष्टाचाराचे आरोप

भक्तांना पावणारा म्हणून गणपतीपुळेचा स्वयंभू गणेश प्रसिद्ध आहेच. परंतु भक्तांच्या देणग्यांमुळं गलेलठ्ठ झालेल्या तिथल्या देवस्थानचा कारभारही आता चर्चेत आलाय. ग्रामस्थांनीच देवस्थान कमिटीवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं खळबळ माजली आहे.

Updated: May 4, 2012, 09:26 PM IST

www.24taas.com, गणपतीपुळे

 

भक्तांना पावणारा म्हणून गणपतीपुळेचा स्वयंभू गणेश प्रसिद्ध आहेच. परंतु भक्तांच्या देणग्यांमुळं गलेलठ्ठ झालेल्या तिथल्या देवस्थानचा कारभारही आता चर्चेत आलाय. ग्रामस्थांनीच देवस्थान कमिटीवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं खळबळ माजली आहे.

कोकणातील धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळेत लाखो भक्त आणि पर्यटक दरवर्षी येत असतात. येणाऱ्या भक्तांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी देवस्थाननं भक्तनिवास प्रकल्प राबविण्यास सुरुवात केलीय. परंतु हे भक्तनिवास मंदिरापासून सुमारे पाच किलोमीटर इतक्या दूर अंतरावर बांधण्यात येतंय. भक्तांच्या सोयीपेक्षा देवस्थानातील लोकांनी आपली आर्थिक सोय कशी होईल. या हेतूनं भक्तनिवास दूरवर बांधल्याचा आरोप होतोय. तसंच 2008 मध्ये 110 गुंठे जागा देवस्थानानं खरेदी केलेली असतानाही पुन्हा 75 गुंठे जमीन खरेदी करुन त्याठिकाणी कोट्यवधींचे भक्तनिवास बांधण्यात येणाराय. पूर्वीच्या जमीन खरेदीत 44 लाख रुपये गुंतले असताना कोट्यवधी रुपयांची नवीन जमीन खरेदी करण्यामागे भ्रष्टाचार दडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

 

भक्तांच्या देणगीतून कोट्यवधींचे व्यवहार करणाऱ्या देवस्थानवर ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले असले तरी देवस्थाननं मात्र या प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केलाय.देवस्थान कोणतंही असो, पैशाचा ओघ वाढल्यानंतर ते नेहमीच चर्चेत येते. भक्तांच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. हे खरं असलं तरी त्यातून काहीजण नक्कीच हात ओले करत आलेत. त्यामुळंच गणपतीपुळेतील ग्रामस्थांच्या आरोपांची चौकशी होण्याची गरज आहे.