www.24taas.com, रत्नागिरी
रत्नागिरीत सध्या चोर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय. गेल्या काही दिवसांत शहरात सातत्यानं घरफोड्या होत आहेत. अपु-या पोलीस बळामुळं रत्नागिरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. पंधरा दिवसांत पंधरा घरफोड्या, चार महिन्यात चार सशस्त्र दरोडे.... सर्वसामान्यांच्या मनात चोर दरोडेखोरांची दहशत निर्माण करणारी ही आकडेवारी आहे रत्नागिरी शहरातली... रत्नागिरी शहरात कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे हे या घटनांवरुन स्पष्ट होतंय.
अडीच लाख लोकसंख्येसाठी अवघे ८८ पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यातल्या पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या, शासकीय बंदोबस्त आणि संरक्षण याला लागणारं पोलीसबळ वगळलं तर, अवघ्या २५ पोलिसांच्या खांद्यावर शहराची कायदा सुव्यवस्था असल्याचं स्पष्ट होतयं. तोकड्या पोलीस बळामुळं चोर दरोडेखोरांचं फावलयं. चोरांचं मनोबल एवढं वाढलंय. की चोर आता दिवसाढवळ्याही दरोडे घालू लागले आहेत.
पोलिसांना अनेकवेळा २४-२४ तास ड्य़ुटी करावी लागते. त्यामुळं पोलिसांवर कामाचा ताण आहे. रत्नागिरी पोलीस प्रशासनानं राज्याच्या गृहखात्याकडं जादा पोलीस बळ वाढवून देण्याचा प्रस्ताव पाठवलाय.मात्र आबांच्या गृहखात्यानं अद्यापही या प्रस्तावाकडं लक्ष दिलेलं नाही. रत्नागिरी शहराची ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता चोर शिरजोर झालेत की आबांचं पोलीस खातं कमजोर झालंय असा प्रश्न रत्नागिरीकरांना पडलाय.