www.24taas.com, ठाणे
सध्या सर्वांनाच वेध लागलेत ते वर्षा सहलीचे... मुंबईपासून तास-दीड तासांच्या अंतरावर असलेले सह्याद्रीच्या कुशीतले धबधबे मुंबईकरांना खुणावत आहेत. अशाच धबधब्यांपैकी एक म्हणजे बदलापूर जवळील कोंडेश्वरचा धबधबा... निसर्ग सौदर्यानं नटलेला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.
सह्याद्रीच्या पर्वतराजीत हिरवा शालू परिधान करून एखाद्या नववधूसारखा नख-शिखांन्त नटलला हा आहे कोंडेश्वरचा परिसर... बदलापूर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला हा कोंडेश्वरचा परिसर म्हणजे निसर्गानं दिलेलं एक वरदान... भातशेतीची खाचरं, रिमझिम पावसातील धुक्याची दुलई आणि दुसरीकडे ताठ मानेनं डौलात उभी असलेली सह्याद्रीची पर्वतरांग... असा नैसर्गिक वारसा दिमाखात मिरवणारा हा परिसर पर्यटकांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे.
कोंडेश्वरची प्रमुख खासियत म्हणजे इथलं प्राचीन शिवमंदिर, फेसळत कोसळणारे धबधबे आणि ट्रेकर्स मंडळींसाठी खुणावणारी सह्याद्री पर्वतराजी... खरं तर शहरापासून इतक्या जवळ जंगल असं कुठेच नाही ते फक्त कोंडेश्वरमध्ये पाहायला मिळतं. कोंडश्वरचे दोन सुप्रसिद्ध धबधबे म्हणजे जणू इथल्या निसर्गाच्या शिरपेचातील दोन मानबिंदू... निसर्गनिर्मित या दोन्ही धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक इथं येतात. वाऱ्याचा येणारा आवाज पर्यटकांना धुंद करतो.
महाबळेश्वर, लोणावळा, पाचगणी या ठिकाणांचा तोच-तोचपणा, गर्दी- गोंगाट, प्रदूषण किंबहूना इतर ठिकाणांपेक्षाही सरस निसर्ग सौंदर्य आणि शांतता कोंडेश्वरमध्ये अनुभवता येते. हिरव्यागार वनराजीत नटलेला कोंडेश्वरचा परिसर पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडल्याशिवाय राहत नाही.
.