विरारच्या शनी मंदिरात चोरी

विरारमधील गासकोपरी भागातील शनिमंदीर अनेकांचं श्रध्दास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र चोरांनी या मंदिरालाही सोडलं नाही. त्यांनी चक्क देवाच्या घरीच चोरीच केली.त्यांचा हा चोरीचा कारनामा मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Updated: Feb 23, 2012, 08:04 PM IST

प्रवीण नलावडे, www.24taas.com, वसई 

 

विरारमधील गासकोपरी भागातील शनिमंदीर अनेकांचं श्रध्दास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र चोरांनी या मंदिरालाही सोडलं नाही. त्यांनी चक्क देवाच्या घरीच चोरीच केली.चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून लाखोंची रोकड लंपास केली. त्यांचा हा चोरीचा कारनामा मंदिरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

विरार भागातील गासकोपरी परीसरातील शनीमंदीरात काल रात्री काही अज्ञात चोरट्यांनी दान पेटीला लक्ष करत दान पेटीतील रोकड चोरुन नेली. सकाळी जेव्हा मंदिराचे पुजारी मंदिरात पुजा करण्यासाठी आले तेव्हा मंदिराच्या दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. तेव्हा त्याना संशय आला. पुजाऱ्यांनी मंदिराच्या आत धाव घेतली तेव्हा त्याने मंदिराच्या आतील दृष्य पहीले असता त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण दान पेटीचे कुलूप तुटले होते आणि त्यातील रोकड लंपास करण्यात आली होती. सदर घटना  पुजाऱ्याच्या लक्षात येताच त्याने मंदिराच्या विश्वस्तांकडे धाव घेतली. मंदिराच्या विश्वस्तांनी मंदिरात पोहचून मंदिराची पाहाणी केली. मंदिराच्या विश्वस्तांनी क्षणाचाही विलंब न करता मंदिरात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेराचे फुटेज तपासण्यास सुरूवात केली. फुटेज पाहताच ते चक्राऊनच गेले.

 

रात्री साडे तीनच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश मिळवला होता. मंदिरात प्रवेश मिळवल्या नंतर या चोरट्य़ांनी मंदिराची पाहणी केली. चोरट्यांनी मंदिरातील दोन्ही दान पेटीची पाहणी केली आणि दान पेटीला लावण्यात आलेले कुलूप कटावणीच्या साह्याने तोडले. याच दरम्यान चोरट्याचा एक साथीदार मंदिराच्या बाहेर लक्ष ठेऊन होता. तर दुसरीकडे मंदिराच्या आतील चोरट्याने कटावणीच्या मदतीने मंदिरातील दान पेटीचे कुलूप तोडून दान पेटीतील रोख पोत्यात भरली. मंदिरातील पहिल्या दान पेटीतील रोख लुटल्यावर चोरट्यांनी मंदिराच्या आतील दान पेटीकडे मोर्चा वळवला आणि मंदिराच्या आतील दान पेटीचे कुलूप तोडून चोरट्य़ांनी या दान पेटीतील पन्नास ते साठ हजाराची रोख पोत्यात भरली आणि ते फरार झाले. मात्र चोरट्यांचा हा कारनामा CCTV कॅमेरात कैद झाला होता. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार चोरट्यांचा शोध घेत आहे.