आदिवासी गावात ज्ञानगंगा...

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातलं आदिवासीचं एक दुर्लक्षित गाव म्हणजे कोलामगुडा... या गावातील रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण या मूलभूत समस्यांबाबत 'झी २४ तास'नं वारंवार आवाज उठवला. आता पुन्हा एकदा 'झी २४ तास'च्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळं गावात ज्ञानगंगा वाहणार आहे.

Updated: Jun 29, 2012, 10:14 AM IST

 www.24taas.com, आशिष अंबाडे, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातलं आदिवासीचं एक दुर्लक्षित गाव म्हणजे कोलामगुडा... या गावातील रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण  या मूलभूत समस्यांबाबत 'झी २४ तास'नं वारंवार आवाज उठवला. आता पुन्हा एकदा 'झी २४ तास'च्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळं गावात ज्ञानगंगा वाहणार आहे.

या चिमुकल्यांच्या डोळ्यात नवी चमक दिसतेय. आपणही या देशाचं भविष्य घडवण्यात मोलाचा वाटा उचलू शकतो, असा विश्वासही त्यांच्यात निर्माण झालाय. कारण चंद्रपुरातल्या राजुरा तालुक्यातल्या कोलामगुडा इथल्या आदिवासींच्या गावात पहिली शाळा सुरु झालीय. सरकारच्या दुर्लक्षामुळं भूमिहीन झालेल्या या आदिवासींच्या मुलांना शिक्षणासाठी शाळा नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर 'झी २४ तास'नं सातत्यानं याचा पाठपुरावा केला. जिल्हा परिषदेनंही शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन कोलामगुड्यात शाळा सुरु केलीय. पहिली ते चौथी पर्यंतच्या या शाळेत सध्या २१ आदिवासी विद्यार्थी आहेत. या ठिकाणी सरकारनं एका शिक्षकाचीही नेमणूक केलीय. आदिवासी चिमुकल्यांना शिकण्याची संधी मिळाल्यानं ते नव्या उमेदीनं कार्यरत झालेत.

या भागात शाळा सुरु झाल्यानं आदिवासी नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय. शिवाय इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा शिक्षण महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळं मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेले कोलामगुड्यात आता ज्ञानगंगा वाहू लागलीय. पहिल्यावहिल्या शाळेमुळं आदिवासींच्या मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळालाय. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याचं एक पाऊल पुढं पडलंय यांत शंका नाही.

.