श्रीकांत राऊत, www.24taas.com, यवतमाळ
यवतमाळ पोलीस ठाण्यात दर दिवशी एक ना एक वाहनचोरीची तक्रार दाखल होत असे. कारण शहरात वाहन चोरांनी उच्छाद मांडला होता. भरदिवसा,भरचौकांतून,पार्किंग तळातून वाहनांची चोरी होत असे. मात्र आता नागरिकांनी तुर्तास सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण ती अट्टल वाहनचोरांची पोलिसांनी गजाआड केली आहे.
यवतमाळ पोलिसांनी जमीर खान उर्फ वकील मोईनुल्ला खान ,मुजीब खान इमान खान पठाण,शोएब बेग,नजीब बेग,राहूल भिरड आणि विक्रमसिंग ठाकूर यांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अटक सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून यवतमाळ शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या आरोपींवर वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटक आरोपींनी गेल्या काही दिवसात शहरातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहणांची चोरी करुन शहरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं. आरोपी शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी वाहनांच्या चोरीचा सपाटाच लावला होता. आरोपींनी शहरातील वेगवेगळ्या शाळा,रुगणालय,तसेच वाहनतळांना लक्ष करत या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांची चोरी करुन शहरात दहशत पसरवली होती.
सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांच्या दुचाकी वाहनांवर आरोपी नजर ठेऊन असायचे. एखाद्याने पार्किंग लॉटमध्ये वाहन पार्क केलं की आरोपी बनावट चावीच्या मदतीने हँडललॉक तोडून ती दुचाकी वाहन घेऊन पोबारा करायचे. या सर्व आरोपींचा गेल्या अनेक दिवसांपासून हा धंदा राजरोसपणे सुरु होता. भर दिवसा यवतमाळातील कोणत्याना कोणत्या पोलीस ठाण्यात एक तरी गाडी चोरी गेल्याची तक्रार दाखल होत होती. वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. वाहन चोरांना आळा घालण्याचे पोलिसान समोर आव्हान होतं. पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गस्ती वाढवल्या होत्या मात्र आरोपी पोलिसांना प्रत्तेक वेळी गुंगारा देत होते. आरोपींना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक स्थापन केलं आणि हे विशेष पथक आरोपींचा शोध घेत होते. अशातच पोलिसांना या टोळी विषयीची माहीती खबऱ्याने दिली आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपी चोरीची गाडी विकण्यासाठी येणार असलेल्या ठिकाणी सापळा लावत पोलिसांनी या टोळीला बेड्य़ा ठोकल्या.
पोलिसांनी अटक टोळी कडून घटणनेच्या वेळी विकण्यासाठी आणलेली चोरीची दुचाकी जप्त केली असुन आरोपींकडे चौकशी करुन या टोळी कडून तब्बल ८९ चोरीची दुचाकी वाहनं हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस आता अटक आरोपींकडे याप्रकरणी अधिक चौकशी करत असुन टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.