विधान परिषद निवडणूक - आघाडीत बिघाडी

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

Updated: May 7, 2012, 08:41 PM IST

www.24taas.com, परभणी

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत. परभणीत राष्ट्रवादीतर्फे बाबाजानी दुर्राणी यांनी अर्ज भरलाय.

 

राष्ट्रवादीसाठी जागा सुटलेली असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या जयंत जाधव यांच्याविरोधात काँग्रेसचे राजेंद्र चव्हाणके यांनी अर्ज दाखल केलाय. त्यामुळं आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडं मुख्यमंत्र्यांनी मात्र काँग्रेसमधल्या बंडखोरांची समजूत काढू असं सांगतायेत.बंडखोरांना उमेदवारी मागे घ्यायला लावू असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

 

नाशिकमध्ये राष्ट्रवादीविरोधात काँग्रेस बंडखोर

विधान परिषदेच्या नाशिक स्वराज्य संस्था मतदार संघात राष्ट्रवादीच्या जयंत जाधव यांना काँग्रेस बंडखोरानं आव्हान दिलय. त्यातच शिवसेना आणि मनसेनंही अर्ज भरलेत. अर्ज माघारीपर्यंत पडद्यामागून अनेक हालचाली होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं नाशिकमध्ये उत्कंठावर्धक सामना होण्याची चिन्हे आहेत.

विधान परिषदेच्या सहा जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी तीन जागा लढवण्याचे जाहीर केलय. मात्र नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात आघाडीत बिघाडी झालीय. राष्ट्रवादीनं आमदार जयंत जाधव यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. त्यांचा अर्ज भरण्यासाठी दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नाशिकला आले होते. मात्र जाधव यांना काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी रविंद्र चव्हाणके यांनी आव्हान दिलय. विशेष म्हणजे चव्हाणके अर्ज दाखल करताना काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे उपस्थित होते. सिन्नरच्या राजकारणात भुजबळ हस्तक्षेप करत असल्याचा आरोप कोकाटे यांनी करत त्यांना आव्हान दिलय. मात्र आघाडीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

 

नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडे 145 तर काँग्रेसकडे 78 मते आहेत. नाशिक स्वराज्य संस्था मतदार संघात 475 मतदार आहेत. यातील किती मतं फुटतात यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. राष्ट्रवादीतला भुजबळ विरोधी गट काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कदाचित चव्हाणके यांनी माघार घेतीलही मात्र त्यानंतर तरी काँग्रेसचे मतदार मनानं राष्ट्रवादीला कितपत मदत करतील ही शंका आहे. याशिवाय शिवसेनेकडून शिवाजी सहाने तर मनसेकडून सलीम शेख यांनी अर्ज भरलाय. शिवसेनेकडे 80 तर मनसेची 50 मते आहेत. 30 मतं असलेल्या भाजपची अजून रणनिती ठरलेली नाही. अर्ज माघारीची मुदत 10 मे आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

 

 

कोकणः अनिल तटकरेंचे शक्ती प्रदर्शन

कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अनिल तटकरे यांनी शक्तीप्रदर्शन करत आज अर्ज दाखल केला.... तटकरेंनी काँग्रेसच्या नारायण राणेंची साथ मिळवली खरी, पण आपल्याच पक्षाचे राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी यावेळी पाठ फिरवल्यानं राष्ट्रवादीतली गटबाजी समोर आली.... 25 मे रोजी होणा-या या निवडणुकीत 632 मतदार मतदान करणार आहेत... सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरेंना राष्ट्रवादीनं पुन्हा उमेदवारी दिलीय.... त्यांच्याविरोधात शिवसेनेनं उमेश शेट्ये यांना उमेदवारी दिलीय.... तटकरेंचा अर्ज भरण्यासाठी राणेंनी खास उपस्थिती लावली, पण तटकरे आणि राणेंचे आघाडीतले विरोधक असलेल्या भास्कर जाधव यांची अनुपस्थिमुळे राष्ट्रवादीतले मतभेद चव्हाट्यावर आले....