www.24taas.com, जयेश जगड, अकोला
अकोला जिल्ह्यातल्या बहादुरा गावातले विठ्ठल माळी यांनी मत्स्यशेतीच्या माध्यमातून परिवर्तनाची किमया साधलीय. विठ्ठल यांनी पहिल्याच वर्षात पावणेदोन लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. एका हंगामात १०० क्विंटलपेक्षा मासळीचं उत्पादन घेत त्यांनी यशस्वी मत्स्यशेती सुरु केली. खारपाणपट्ट्य़ाचा अभिशाप असलेल्या भागातल्या माळी यांनी ही अनोखी वाटचाल करून दाखवली आहे.
अकोला जिल्ह्याचा तीन चतुर्थांश भाग खारपाण पट्ट्यात मोडतो. बाळापूर तालुक्यातल्या विठ्ठल माळींची वडिलोपार्जित जमीनही याच पट्टयात मोडते. शिवाय या भागातली जवळपास तीन एकर जमीन खोलगट भागात असल्यानं ती पडिकच होती. विठ्ठल माळींमधील सर्जनशील शेतकऱ्यानं याच भागाचा उपयोग मत्स्यशेतीसाठी करण्याचा निर्णय केला आणि २०१० मध्ये या पडिक भागात १२५ बाय ८० आकाराचं पहिलं शेततळं खोदलं.
शेततळ्याच्या निर्मितीनंतर विठ्ठल यांनी महानमधल्या काटेपूर्णा प्रकल्पातून मत्स्यबीज विकत आणलं. यात रोहू कातला, मृगळ जातीची ४५ हजार मत्स्यबीज होती. ऑक्टोबरमध्ये पुन्हा त्यांनी २५ हजार मत्स्यबीज खरेदी केले. जून २०११ पासून माळींना खऱ्या अर्थानं मासळी उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. आणि पहिल्याच हंगामात त्यांना पावणे दोन लाखाचा निव्वळ नफा झाला. दोन शेततळी खोदण्यासाठीचा खर्च आला तो एकूण ३ लाख ५० हजार रुपये. तर १६ हजारात ७५ हजार मत्स्यबीजे त्यांनी खरेदी केलं. मत्स्यखाद्यावर त्यांनी २४ हजार खर्च केले तर युरिया आणि फॉस्फेटसाठी त्यांना खर्च आला २,५०० रुपये. शेंगदाणा ढेप, सरकी ढेप सोयाबीन ढेप यावर अनुक्रमे ९००, १,३०० आणि ७५० रुपये असा खर्च आला. अशा प्रकारे एकूण खर्च ३ लाख ९५ हजार रुपये इतका झाला.
शेतीपूरक व्यवसाय हा समृद्धीकडे नेणारा मूलमंत्र असल्याचं विठ्ठलराव आवर्जून सांगतात. त्यांच्या या प्रयत्नाचं कौतुकही झालंय. भारत कृषक समाजानं त्यांना कृषी गौरव पुरस्कार देत त्यांच्या कामाचा सन्मान केलाय.
.