www.24taas.com, नाशिक
गोदावरीचं रक्षण करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे खासगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाईची सुरक्षा सोपवली जाईल, असा संशय व्यक्त होतोय. पण या सगळ्या गदारोळात गोदावरीच्या प्रदुषणाचा मुद्दा मात्र बाजूलाच राहतोय. एकेकाळी स्वच्छ पाण्यानं संथपणे वाहणारी गोदामाई दुषित झालीय.
गोदावरी स्वच्छ करण्याचा मुद्दा दर आठ दिवसांनी उचल खातो आणि नंतर पुन्हा लुप्त होतो. गोदावरीच्या पाण्यात धुणं धुणारे, गाड्या धुणारे, निर्माल्य आणि कचरा टाकणारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. रामकुंड, लक्ष्मणकुंड या परिसरात 25 सुरक्षारक्षक पहा-यासाठी सज्ज असतील.
गेल्यावर्षीही अशा प्रकारे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते. पण त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्तावच सादर न झाल्यानं ते निघून गेले. त्यावर स्थायी समितीनं मनपानंच सुरक्षारक्षक नेमावे, असा ठराव केला. पण महापालिकेचा इतिहास पाहता, खाजगी सुरक्षारक्षकांच्या हातीच गोदामाई सोपवण्यात येईल, असा संशय व्यक्त होतोय.
गोदावरीचा श्वास घोटला जातोय तो पानवेलींच्या विळख्यामुळे आणि नदीत सोडण्यात येणा-या गटाराच्या पाण्यामुळे... पण या विषयावर प्रशासन काहीच करायला तयार नाही. मुख्य रोगावर इलाज करायचा सोडून फक्त वरवरच्या उपाययोजना केल्या जात आहेत.