www.24taas.com, नाशिक
नाशिक जिल्ह्यात नरभक्षक बिबट्यानं एका महिन्यात तीन जणांचे बळी घेतल्यानं दहशतीचं वातावरण आहे. सिन्नर तालुक्यात एक आणि निफाडमध्ये दोन मुलांना भक्ष्य बनविल्याने ग्रामीण भागात ही दहशत अधिक आहे. शनिवारी गिरणारे भागात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्यानं वनविभागानं आता पिंजरे लावण्यास सुरुवात केलीय.
२५ मार्चला नाशिक शहरातील रामवाडीत चार जण जखमी, १२ एप्रीलला दिंडोरी तालुक्यात दोन जण जखमी, १९ एप्रिलला वणीच्या मंदाने शिवारात एक जण जखमी, ४ एप्रिलला निफाड तालुक्यात एक वर्षाचा तर २८ एप्रिलला सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. या उन्हाळ्यात तहानलेल्या बिबट्याला पाण्याबरोबर रक्ताची चटक लागली आणि नरभक्षक बिबट्यानं नागरिकांवर हल्ले सुरु केले. राज्यात कुठेही न घडलेल्या अशा हिंस्र घटना नाशिक जिल्ह्यात घडू लागल्यानं ग्रामीण भागात प्रचंड भीतीच वातावरण आहे. जंगलांमध्ये पाणी नसल्यानं बिबट्यांना भक्ष्य दिसणं कठीण झालंय .त्यामुळं भुकेने आणि तहानेनं व्याकुळ झालेले बिबटे मानवी वस्तींमध्ये येत असल्याचं वन खात्याचं म्हणणं आहे.
ठिकठिकाणी मागणीनुसार पिंजरे लावण्यात येत असले तरी वेगवान बिबट्याचा पाठलाग करणे वनविभागाला शक्य होत नाहीय. सिन्नर, दिंडोरी, कधी निफाड तर कधी गिरणारेच्या शेतात बिबट्या दर्शन देत असल्यानं त्याला जेरबंद तरी कसे करायाचे असा प्रश्न वन खात्याला पडलाय. नरभक्षक झालेल्या या बिबटयाला पकडण्याचे आव्हान आता वन अधिकार्यानासमोर उभं ठाकलं आहे.