Santosh Deshmukh Murder: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. हत्येत सहभागी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. अशाप्रकारे एकूण तिघांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
हत्येत सहभागी दोन मुख्य आरोपींना तब्बल 25 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हाच मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात होतं. मारहाणीत संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर तपासाची मागणी होत होती. एसआयटी, सीआयडी तपास करत असताना अखेर दोन आरोपीना अटक करण्यात यश आलं आहे. एक आरोपी मात्र फरार आहे. दरम्यान हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांचं सतत लोकेशन देणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आल्याचं समजत आहे.
अटक केल्यानंतर पोलीस आता या दोन्ही आरोपींचा सहभाग नेमका कसा होता याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील. तसंच आतापर्यंत हाती लागलेले धागेदोरे आणि त्यांच्या चौकशीत येणारी माहिती जुळवण्याचा प्रयत्न असेल.
26 वर्षीय सुदर्शन घुले याच्यावर 10 वर्षात 10 गुन्हे दाखल आहेत. केज पोलिसात तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत. मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर 22 वर्षीय सुधीर सांगळे याच्यावर आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे.
खंडणी प्रकरणात सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरणागतीआधी व्हिडिओ पोस्ट करत आपण निर्दोष असल्याचं वाल्मिकने सांगितलं होतं. मात्र आता वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एका मोठा आणि महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे. कारण वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एक महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. आतापर्यंत वाल्मिक कराड पवनचक्की प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा करत होता. पण आता खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णू चाटेने सीआयडीला माहितीमुळे वाल्मिकच्या अडचणी वाढल्या आहेत.
वाल्मिक कराड आणि पवनचक्की कंपनीच्या अधिका-यांचं फोनवरून संभाषण झालं होतं, अशी मोठी कबुली चाटेने दिली आहे. सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. वाल्मिकने विष्णू चाटेच्या फोनवरूनच धमकी दिल्याची तक्रार कंपनीच्या अधिका-यांनी दिली होती. याच बाबत चाटेनं दोघांचं बोलणं झाल्याची कबुली दिली आहे.