www.24taas.com, नाशिक
वाहनचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी नवं फर्मान सोडलंय. शहरात ज्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होईल त्याची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलंय.
नाशिकमध्ये स्कुटर्स किंवा बाईक्ससाठी १६, तर कार्ससाठी १२ ठिकाणी वाहन बाजार आहेत. जुन्या गाड्यांची खरेदी विक्री यामध्ये होते. आता या वाहनांच्या खरेदी विक्रीची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलंय. शहरातल्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. पोलिसांच्या या आदेशामुळे वाहन ख़रेदी विक्रीचा व्यवहार करणा-यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया वाहन विक्रेत्यांमधून उमटतेय. शहर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी हे नवं फर्मान सोडलंय. आता या आदेशाची अंमलबजावणी होणार का हेही बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.