पाचपुतेंनी केला आचारसंहितेचा भंग?

आचारसंहिता आहे हे माहित असूनही आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुतेंनी नाशिकमध्ये घोषणांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनीही त्यांचीच री ओढली.

Updated: Jan 6, 2012, 05:08 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

आचारसंहिता  आहे हे माहित असूनही आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुतेंनी नाशिकमध्ये घोषणांचा  पाऊस पाडला. विशेष म्हणजे राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनीही त्यांचीच  री ओढली. या प्रकारामुळं पाचपुते निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.

 

आदिवासी विकास मंत्र्यांची आश्वासनंच त्यांना आता अडचणीत आणू शकतात. आपल्या वेगवेगळ्या विधानांनी स्वतःला आणि इतरांना वेळोवेळी अडचणीत  आणणाऱ्या ह.भ.प. पाचपुतें आता निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. नाशिकमधल्या आदिवासींच्या संमेलनात पाचपुतेंनी आचारसंहितेचा भंग करत घोषणांचा पाऊस पाडल्याचा आरोप करत शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे.

 

पाचपुतेंनी मात्र विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तर विरोधकांच्या तक्रारीची दखल घेत सर्व भाषणं तपासून कारवाई करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर आता पाचपुतेंनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळं  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये आचारसंहितेचा भंग करण्याची स्पर्धाच लागल्याचा आरोप आता विरोधकांकडून होतोय.

 

[jwplayer mediaid="24696"]