महाघोटाळा उघड होऊनही न्याय अजून नाहीच

ळे जिल्ह्यात NRHMमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर येऊन वर्ष उलटलं, तरी याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचं धैर्य जिल्हा परिषदेकडून दाखवण्यात आलेलं नाही.

Updated: Feb 8, 2012, 12:45 PM IST

प्रशांत परदेशी, www.24taas.com, धुळे

 

धुळे जिल्ह्यात NRHMमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर येऊन वर्ष उलटलं, तरी याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचं धैर्य जिल्हा परिषदेकडून दाखवण्यात आलेलं नाही. अनेक तक्रारी करुनही आणि वरिष्ठांनी चौकशीचं पत्र देऊनही स्थानिक अधिकारी चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत.

 

धुळे जिल्ह्यात २००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधीही मिळतो. मात्र या अभियानात भोंगळ कारभार झाल्याचं समोर आलं आहे. या गैरप्रकाराबाबत तक्रारीही करण्यात आल्या. तसंच NRHMच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या भ्रष्टाचाराची चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी प्रयत्न केले मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी याची दखल घ्यायला तयार नाहीत.

 

या घोटाळ्याच्या चौकशीची बोंब असताना काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संधी साधत बदल्याही करुन घेतल्या तर भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवू पहाणाऱ्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ताही दाखवण्य़ात आला. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात चौकशी कऱण्याऐवजी हे प्रकरण गेले वर्षभर चौकशीच्या दुष्टचक्रात अडकून पडलं आहे. एन.आर.एच.एमच्या प्रत्येक बाबीमध्ये लचके तोडण्याचं काम झालं असताना अधिकाऱ्यांकडून चौकशीच्या नावाखाली टाळाटाळ केली जात आहे. महाघोटाळा उघड झाल्यानंतरही शासनदरबारी न्यायासाठी झगडण्याची वेळ येणं ही लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल.