एकाच घरात ३० कुटुंबं !

निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ हा आपल्याकडे नवीन प्रकार नाही. पुण्यात तर एकाच बंगल्यात १०३ मतदार राहत असल्याची धक्कादायक नोंद करण्यात आली आहे. अर्थात हे सगळे बोगस मतदार असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही.

Updated: Jan 14, 2012, 08:49 PM IST

अरूण मेहेत्रे, www.24taas.com,पुणे

 

निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ हा आपल्याकडे नवीन प्रकार नाही. पुण्यात तर एकाच बंगल्यात १०३ मतदार राहत असल्याची धक्कादायक नोंद करण्यात आली आहे. अर्थात हे सगळे बोगस मतदार असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रभाग क्रमांक नऊ म्हणजेच बाणेरमधील यादी भाग क्रमांक दहामध्ये एकाच पत्त्यावर १०३ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. इथल्या घर क्रमांक १०४५ मध्ये १६ आडनावांची ३० कुटुंब राहत असल्याचं मतदार यादीतून स्पष्ट झालं आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे.

 

हा बंगला एकाच मालकाचा असून तेदेखील मुंबईत राहतात. याचाच अर्थ मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नावं ही बोगस मतदारांची आहेत. कुठल्याही प्रकारच्या सबळ पुराव्याशिवाय किंवा खोट्या पुराव्यांच्या आधारावर ही नोंदणी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे केवळ हीच १०३ नावं नाहीत तर या प्रभागांमध्ये सुमारे साडेचार ते साडेपाच हजार बोगस मतदार घुसडण्यात करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

मतदार यादीतील या घोळाच्या विरोधात याठिकाणचे राष्ट्रवादीसह याठिकाणचे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. संबंधित यंत्रंणांकडे पाठपुरावा करूनही यादीमध्ये सुधारणा होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. या समस्येवर निवडणूक आयोगाकडेही काहीच उत्तर नाही.

 

मतदार याद्यांमधील या घोळामुळे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुका पारदर्शी तसंच निष्पक्ष पद्धतीनं पार पडतील का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. संबंधित यंत्रणांनी अशाप्रकारांची वेळीच दखल घेणं गरजेचं आहे.