संगीत नाटक अकादमीने डॉ.रा.चि.ढेरे यांना टागोर अकादमी पुरस्कार जाहीर केला आहे. असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेल्या डॉ.रा.चि.ढेरे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संत साहित्य, ग्राम दैवते, भक्ती संप्रदाय, धार्मिक स्थळं, लोक साहित्य, लोक कलेच्या संशोधनात आणि लेखनात व्यतित केलं आहे.
डॉ. रामचंद्र चिंतामणी ढेरे यांचा जन्म पुण्या जवळच्या निगडे या छोट्याशा गावात २१ जुलै १९३० रोजी झाला. डॉ.ढेरे यांनी १९७५ साली पीएचडी संपादन केली. तसंच १९८० साली पुणे विद्यापीठाने त्यांना डी लीट देऊन सन्मानित केलं. गेली ५५ वर्षे अविरत संशोधन आणि लेखन यांनी त्यांचे संपूर्ण जीवन व्यापून टाकलं आहे.
आजवर नाथ संप्रदायाचा इतिहास, दत्त संप्रदायाचा इतिहास, चक्रपाणी, लज्जागौरी, खंडोबा, विठ्ठल एक महासमन्वय तसंच भारतीय रंगभूमीच्या शोधात या सारखे संशोधन ग्रंथ त्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून साकारले आहेत. आजवर १०५ ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर जमा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पंरपरेचा अभ्यास करणारे देश आणि विदेशातील अनेक संशोधक डॉ.ढेरेंच्या ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग करतात. श्री तुळजाभवानी हा त्यांचा गेल्या काही महिन्यांमध्ये प्रकाशीत झालेला ग्रंथ. महाराष्ट्र सरकारने डॉ. रा.चि.ढेरे यांना महाराष्ट्र गौरव तर महाराष्ट्र फाऊंडेशनने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.